महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जून ।। वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनने अचानक निवृत्ती जाहीर केल्यानं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. पूरनने अवघ्या २९ व्या वर्षी निवृत्ती जाहीर केलीय. सोशल मीडियावर निकोलस पूरनने त्याच्या निवृत्तीबाबत पोस्ट केलीय. निवृत्ती घेण्याचा निर्णय कठीण होता असं त्यानं म्हटलंय.
वेस्ट इंडिजकडून १६० पेक्षा जास्त मर्यादीत षटकांचे सामने खेळणारा निकोलस पूरन कसोटी क्रिकेट खेळला नव्हता. ६१ टी२० सामने आणि १०६ एकदिवसीय सामने खेळताना त्याने ४ हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये झालेल्या मालिकेत त्यानं विश्रांतीची मागणी केली होती. आयपीएलमध्ये तो लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत होता. त्यानं १४ सामन्यात २०० च्या स्ट्राइक रेटनं ५२४ धावा केल्या होत्या.
निकोलस पूरनने म्हटलं की, खूप विचार केल्यानंतर मी आंतररराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. पूरन आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. टी२० वर्ल्ड कपला फक्त ८ महिने बाकी असताना त्यानं घेतलेल्या निवृत्तीनं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे.
क्रिकेट या खेळावर मी खूप प्रेम करतो आणि त्यानं मला खूप काही दिलंय आणि देत राहील. वेस्ट इंडिजच्या संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची मला संधी मिळाली. मरून रंगाची जर्सी घालणं, राष्ट्रगितासाठी उभा राहणं आणि प्रत्येक वेळी मैदानात उतरताच आपलं सर्वस्व झोकून खेळणं हे शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करणंही एक सन्मान आहे आणि ही बाब कायम माझ्या हृदयात असेल असंही निकोलस पूरनने म्हटलंय.