![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जून ।। राज्यात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार, राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि मराठवाडा परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या हवामान प्रणालींमुळे राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस घाट विभागात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुण्यात पावसाची शक्यता:
पुणे परिसरात आज कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोमवारी कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असून, हलक्या पावसाची अपेक्षा आहे.
राज्यात आज कुठे कुठे अलर्ट?
मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : रत्नागिरी.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : मुंबई, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर.
विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
