महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जून ।। टेम्बा बावुमा आजचा यशस्वी कर्णधार… ज्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) जिंकली. पण या ट्रॉफीपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. हे फक्त क्रिकेटमधलं यश नाही, तर एका मुलाच्या संघर्षाची, जिद्दीची आणि स्वप्नासाठी झगडण्याची कहाणी आहे.
टेम्बा बावुमाचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनजवळील लांगा या झोपडपट्टीत झाला. ही एक अशी जागा होती जिथे दिवसाला दोन वेळचं अन्न मिळणंही कठीण वाटायचं. समाजात वर्णभेद अजूनही खोलवर रुजलेला होता. अशा वातावरणात एका कृष्णवर्णीय कुटुंबातील मुलाला ‘क्रिकेटर’ बनायचं स्वप्न बघायची मुभा नव्हती. पण शाळेच्या मैदानात खेळताना त्याचं कौशल्य शिक्षकांच्या नजरेत आलं आणि तेव्हा पासून टेम्बाच्या आयुष्याला दिशा मिळाली.
पण संघर्ष इथेच संपला नाही त्याच्यावर अनेकदा टीका झाली. ‘तो बुटका आहे’, ‘तो कृष्णवर्णीय आहे’, ‘तो टिकणार नाही’. पण एक फलंदाज म्हणून, एक क्षेत्ररक्षक म्हणून आणि नंतर कर्णधार म्हणूनही टेम्बा प्रत्येक टीकेला उत्तर देत गेला. दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी शतक झळकावणारा तो पहिला कृष्णवर्णीय आफ्रिकन क्रिकेटपटू होता आणि संघाचे नेतृत्व करणारा तो पहिला होता. हा केवळ वैयक्तिक विक्रम नव्हता, तर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात एक नविन पान होते.
आज जेव्हा त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये विजय मिळवून ट्रॉफी उचलली आणि ‘गनशॉट’ सेलिब्रेशन करत मैदानात आनंद साजरा केला, तेव्हा लाखो लोकांच्या डोळ्यांत अश्रू आले. कारण त्यांनी एक मुलगा पाहिला जो झोपडपट्टीतून चालत चालत जगाच्या स्टेजवर पोहोचला होता.
बावुमाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
बावुमाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी 64 कसोटी, 48 एकदिवसीय आणि 36 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 38.23 च्या सरासरीने 3708 धावा, एकदिवसीय सामन्यात 41.98 च्या सरासरीने 1847 धावा आणि टी-20 मध्ये 118.17 च्या स्ट्राईक रेटने 670 धावा केल्या आहेत. बावुमाने कसोटीत चार शतके आणि 25 अर्धशतके झळकावली आहेत, तर एकदिवसीय सामन्यात त्याने पाच शतके आणि सात अर्धशतके झळकावली आहेत.
बावुमा एक चांगला कसोटी फलंदाज बनला आहे आणि यात काही शंका नाही. पण, तो इतर भूमिकांमध्येही चांगली कामगिरी करत आहे. बावुमा हा केवळ दक्षिण आफ्रिकेचा पहिला कृष्णवर्णीय कसोटी कर्णधार नाही, तर त्याने त्याच्या नेतृत्वाखाली अद्याप एकही कसोटी सामना गमावलेला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने 10 पैकी 9 कसोटी जिंकल्या आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.