Raj Thackeray : प्रत्येकवेळी सरकार म्हणतं, ‘पीडितांच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभे…’; मनसेप्रमुख राज ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जून ।। मावळ तालुक्यात कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील (Indrayani River) पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले होते. यापैकी चार पर्यटकांचा मृ्त्यू झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. रविवारी रात्री उशीरापर्यंत एनडीआरएफकडून (NDRF Team) बचावकार्य सुरु होते. सध्या याठिकाणी बचावकार्य थांबवण्यात आले असून ड्रोनद्वारे नदीत आणखी कोणी नागरिक अडकला आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारच्या दुर्घटना घडल्यानंतर सरकार एकाच छापाच्या प्रतिक्रिया देते. मात्र, त्यापूर्वी सरकार काय करते, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.

हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला ? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे…’ पण मुळात हा प्रसंग का येतो ? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही ? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत ? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग ?

पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं.

आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *