Alandi flood Alert: आळंदीत इंद्रायणीचा रौद्र अवतार; नदीला पूर, घाट पाण्याखाली, जाणून घ्या परिस्थिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जून ।। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आळंदी आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने इंद्रायणी नदीने रौद्र रूप धारण केले आहे. नदीला मोठा पूर आला असून, ती दुथडी भरून वाहत आहे. या पूरस्थितीमुळे घाटावरील सर्व मंदिरे, पोलिसांचे स्वागत कक्ष आणि महिलांसाठी असलेले चेंजिंग रूम पाण्याखाली गेले आहेत. प्रसिद्ध भक्ती-सोपान पूलही पाण्याखाली गेल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

इंद्रायणीचा प्रकोप, प्रशासनाची सज्जता
इंद्रायणीच्या पाण्याची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचली असून, पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आणि अक्राळविक्राळ बनला आहे. पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात जलपर्णीही वाहत येत आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत नदीघाट पूर्णपणे बंद केला असून, भाविकांना घाटावर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने इंद्रायणी नदीच्या घाटावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जीवरक्षक पथके सज्ज ठेवण्यात आली असून, नदीपात्रात दोन बोटीही तैनात करण्यात आल्या आहेत.

पावसाचा धुमाकूळ, पण वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी नाही
आळंदीत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेत वारकरी पावसापासून स्वतःचा बचाव करताना दिसत आहेत. मात्र, या नैसर्गिक आपत्तीनंतरही आळंदीत दाखल होणाऱ्या दिंड्या आणि वारकऱ्यांच्या उत्साहात तीळमात्रही घट झालेली नाही. पावसाच्या जोरदार धारा झेलत, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात वारकरी मोठ्या भक्तिभावाने आळंदीत प्रवेश करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील माऊलींच्या भेटीची ओढ आणि वारीतील सहभागाचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे.

आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान
आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी वारी पालखी सोहळ्याचे आज (दि.१९) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच आळंदी आणि पंचक्रोशीत पावसाने दमदार हजेरी लावल्याने काहीशा अडचणी निर्माण झाल्या असल्या, तरी वारकऱ्यांचा उत्साह आणि श्रद्धा या सर्वांवर मात करताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *