महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जून ।। पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. पुण्यात मार्केटयार्ड जवळील गंगाधाम चौकात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत या चौकातून जड आणि अवजड वाहनांना प्रवास करण्यास बंदी असणार आहे. गंगाधाम चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वाहतूक विभागाने या ठिकाणी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
गंगाधर चौकात काही दिवसांपूर्वी दुचाकीला ट्रकने धडक दिली होती. या अपघातामध्ये महिलाचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आता वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेत या मार्गावर जड आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. कान्हा हॉटेल ते गंगाधाम चौकदरम्यानच्या रस्त्यावर ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनर आणि इतर सर्व जड, अवजड वाहनांना वाहतुकीसाठी १७ तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
लुल्लानगर चौक- गंगाधाम चौक – चंद्रलोक हॉस्पिटल चौक आणि गंगाधाम चौक- वखार महामंडळ चौक- सेव्हन लव्हज चौक या मार्गांवर ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनर आणि इतर सर्व जड, अवजड वाहनांना वाहतुकीसाठी येण्या-जाण्यास सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी १७ तास वाहतूक अंमलदार नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या रस्त्यावर तीव्र उतार असल्याने जड वाहनांमुळे अपघात होत असून या रस्त्यावर कान्हा हॉटेल, पासलकर चौक, भवानी माता मंदिर, आई माता मंदिर, वाय जंक्शन, गंगाधाम बसस्टॉप येथे आयआरसी नियमाप्रमाणे हाइट बॅरिअर बसवावेत जेणेकरून जड वाहनांना प्रवेश बंद होईल, तसेच आई माता मंदिर येथील रम्बलर जीर्ण झालेली असल्याने आयआरसी नियमाप्रमाणे उच्च दर्जाचे रम्बलर आणि गतिरोधक बसविण्याबाबत महापालिकेच्या मुख्य अभियंता यांना कळविण्यात आले आहे.