Maharashtra Rain: राज्यात या भागात तुफान पाऊस : पुढचे काही तास महत्वाचे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जून ।। राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहेत. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. आजही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुफान पाऊस सुरू आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर चांगला आहे. तर राज्यातील इतर ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर याठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणासह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुले या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, उर्वरित कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तर, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात आज तुफान पावसाचा अंदाज आहे. त्याचसोबत, उर्वरित विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तर उर्वरीत राज्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, येत्या २४ तासांत नागपूर आणि आसपास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवारी रात्री पावसाने धुवाधार हजेरी लावली. मात्र गुरुवारी दिवसभर ढग शांत राहिले. गुरुवारी संध्याकाळपासून पावसाची रिपरिप जिल्ह्यात सर्वत्र सुरू झाली. तर, पुणे शहरात गेले दोन महिन्यात ५११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाचा मान्सून पुणे शहरावर मेहरबान झाला आहे. मागील दोन महिन्यात ५११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली शहराची वार्षिक सरासरी ७०० ते ७५० इतकी आहे. मात्र दोनच महिन्यात शहरात वर्षाच्या ७० ते ८० टक्के सरासरी इतका पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *