राज ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होणार का? शरद पवार स्पष्टच बोलले, ‘ भूमिका राज्याच्या हिताची असेल. तर…’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जून ।। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाळांमधील हिंदी सक्तीला विरोध दर्शवण्यासाठी 5 जुलैला मोर्चा जाहीर केला आहे. राज ठाकरेंनी सर्वपक्षीयांना मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे. तसंच या मोर्चात कोण सहभागी होतं आणि कोण नाही हे पाहतो असा इशाराच दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं असून, कोणीही सांगतं आणि तुम्ही सहभागी व्हावं अशी भूमिका घेता येणार नाही असं विधान केलं आहे. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी पुन्हा एकदा हिंदी सक्तीवर आपली भूमिका मांडली.

“यामध्ये दोन भाग आहेत. पहिली ते चौथीपर्यंत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही. पाचवीपासून हिंदी विद्यार्थाच्याच्या हिताच्या दृष्टीने आहे. देशातील 55 टक्के लोक हिंदी बोलतात. दुसरी भाषा अशी नाही, जी 55 टक्के लोक बोलतात. मराठी, मल्याळम, बंगाली, कानडी यांचा ठराविक लोकसंख्या आधार घेते. यामुळे म्हणून हिंदीला दुर्लक्षित करुन चालणार नाही,” असं स्पष्ट मत शरद पवारांनी मांडलं आहे.

पुढे ते म्हणाले, “साधारणपणे महाराष्ट्रात लोक हिंदीच्या विरोधात नाहीत. पण पहिली ते चौथी हा वयोगट यांच्यासाठी नवीन भाषा आताच आणणं योग्य नाही. तिथे मातृभाषा महत्त्वाची आहे”.

लक्ष विचलित करण्यासाठी हा मुद्दा आणला आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले “असं लोक बोलतात, पण मला माहिती नाही. मी दोन्ही ठाकरेंची विधानं वाचली. मुंबईला गेल्यावर त्यांचं म्हणणं समजून घेणार आहे. त्यांनी काही कार्यक्रम जाहीर कले आहेत. या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. सहभागी व्हायचं असेल तर त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागेल”.

राज ठाकरेंना मोर्चात कोण सहभागी होतं हे पाहायचं आहे असा इशाराच दिला आहे. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “यासंबंधी त्यांनी जे भाष्य केलं आहे ते समजून घ्यावं लागेल. कोणीही सांगतं आणि तुम्ही सहभागी व्हावं अशी भूमिका घेता येणार नाही. पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा, राज्याच्या हिताचा असेल. तर तो जाणून घेणं आणि योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे”.

दरम्यान शरद पवारांनी मला तरी यात काही वाद दिसत नाही असं सांगताना सरकारने पहिली ते चौथीला हिंदीचा हट्ट करु नये असं स्पष्टपणे सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *