महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जून ।। शक्तिपीठ महामार्गाच्या विषयात राजकारण आणले तर याद राखा, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशार्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांनी खिल्ली उडवली आहे. ‘आता आमचं कसं व्हायचं? फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली’ असा खोचक टोला पवारांनी सातार्यात पत्रकार परिषदेत फडणवीसांना लगावला.
सातार्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानंतर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील उपस्थित होते. सातारचा दौरा करून आपण कोल्हापूरला चालला आहात. सांगली-कोल्हापूरच्या शेतकर्यांनी संभाव्य शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला आहे. यावर आपली भूमिका काय राहणार, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर शरद पवार यांनी, हा प्रकल्प काय ते समजून घेईन. त्याची आवश्यकता आहे का? राज्य शासनानेही याबाबत माहिती दिली तर तीही घेईन. शेतकरी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचाही आग्रह समजून घ्यावा लागेल. विरोधासाठी विरोध नको.
याबाबत सर्व समजून घेतल्यानंतरच मी बोलेन, असे त्यांनी स्पष्ट केले.राज्य सरकारने आम्हा लोकांना त्याची माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील शिक्षणात हिंदीला विरोध होत असल्याचा प्रश्नावर खा. पवार म्हणाले, देशातील बहुतांशी वर्ग हिंदी बोलतो. पण, मुले विशिष्ट वयात हिंदी किती आत्मसात करतील याचा विचार व्हावा. त्यामुळे प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती नकोच. सरकारनेही पाचवीपर्यंतचा हिंदीचा हट्ट सोडावा, असा सल्ला पवार यांनी शासनाला दिला.
महायुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील उध्दव सेनेचे पदाधिकारी स्वतंत्र लढण्याची भाषा करत आहेत, असा प्रश्नही पवार यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी निवडणुकीबाबत आघाडीत चर्चा होणार आहे. त्यासाठी आघाडीची बैठक सोमवार दि. 30 जूनला होईल. त्यामध्ये एकत्रित निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. इस्त्रायल-इराण युध्दाबाबतही त्यांनी भारताला स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल, असे मत मांडले