महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै ।। ‘महाराष्ट्रातील हिंदी सक्तीविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला लढा व आजचा विजयी मेळावा कौतुकास्पद आहे. या मेळाव्यातील प्रभावी भाषणे आमचा उत्साह वाढवणारी आहेत. महाराष्ट्रातील या उठावामुळे आमच्या लढ्याला बळ मिळाले आहे,’ अशा शब्दांत तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मराठी विजयी मेळाव्याचे कौतुक केले.
मुंबईतील मराठी विजय मेळाव्यानंतर स्टॅलिन यांनी ‘एक्स’वर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. ‘हिंदी सक्तीविरोधात द्रविड मुनेत्र कळघम व तामीळनाडूचे लोक पिढ्यान्पिढ्या संघर्ष करत आहेत. भाषिक अधिकारांच्या लढ्याचे हे वादळ आता राज्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात पोहोचले आहे. हिंदी न शिकवल्यास तामीळनाडूला निधी देणार नाही अशी अरेरावी करणाऱ्या भाजपला स्वतःची सत्ता असलेल्या राज्यात दुसऱ्यांदा माघार घ्यावी लागली आहे. आता तरी तामीळनाडूविरुद्धचे सुडाचे राजकारण केंद्र सरकार थांबवेल का, असा सवाल त्यांनी केला. निधी वाटपात होणारा दुजाभाव आम्ही सहन करणार नाही.