Nitin Gadkari : “तिसरं महायुद्ध कुठल्याही क्षणी पेटू शकतं कारण….”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुलै ।। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुस्तक प्रकाशनाच्या एका कार्यक्रमात बोलत असताना तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त केली आहे. जगात जी परिस्थिती आहे ती पाहता तिसरं महायुद्ध कधीही पेटू शकतं असं म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. इराण, इराक आणि इस्रायल युद्ध, रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध यामुळे जगातल्या घडामोडी कशा बदलल्या आहेत यावरही नितीन गडकरींनी भाष्य केलं आहे.

नितीन गडकरी यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
“सध्या जगात संघर्षाचं वातावरण आहे. इराक, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरु असणारं युद्ध, युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असणारं युद्ध या दोन्ही युद्धांच्या पार्श्वभूमीवर कधीही जागतिक युद्ध पेटू शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे. म्हणणं बरोबर नाही पण हे मार्गक्रमण विनाशाच्या दिशेने सुरु आहे. शिवाय ज्या महासत्ता आहेत त्यांच्यात असलेली अधिकारवादी आणि हुकूमशाही प्रवृत्ती आहे त्यामुळे प्रेम आणि सौहार्द संपत चाललेलं आहे.” असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आहे.

सध्या युद्धाचे मापदंडही बदलले आहेत-नितीन गडकरी
युद्धाचे मापदंडही बदलले आहेत. रणगाडे, विमानं यांचा रिलिव्हन्स राहिलेला नाही. मिसाईल्स आणि ड्रोन्स यांचा वापर केला जातो आहे. या सगळ्यामध्ये मानवतेचं रक्षण करणं कठीण आहे. मिसाईल्स वापर अनेकदा नागरी वस्त्यांवरही केला जातो. या सगळ्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्याची चर्चा जागतिक स्तरावर होण्याची आवश्यकता आहे. संपूर्ण जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचा हा देश आहे. अशा स्थितीमध्ये स्वाभाविकपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेऊन त्याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. भविष्यातलं धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे. असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

नागपूरमध्ये ‘बियॉन्ड बॉर्डर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, हे संघर्ष अशी परिस्थिती निर्माण करत आहेत. जिथे ‘कधीही’ जागतिक युद्ध सुरू होऊ शकते. युद्धाशी संबंधित तांत्रिक प्रगतीमुळे मानवतेचे रक्षण करणंही कठीण होत आहे. यावर त्यांनी भर दिला. जगाला सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धांची भूमी असं भारताचं वर्णन करताना, आंतरराष्ट्रीय घटनांचा आढावा घेण्याची आणि विचार विनिमय करून भविष्यातील धोरण तयार करण्याची गरज गडकरी यांनी अधोरेखित केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *