महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुलै ।।बारामती शहरात काही जण चुकीच्या दिशेने वाहने नेत आहेत. यापुढे असा कोणी सापडला, तर तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या, त्याला टायरमध्ये घालून झोडा, असे मी पोलिसांना सांगितले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार असो की अजित पवारांचा कोणी नातेवाईक असो, नियम सर्वांना सारखे आहेत, ते मोडू नका, असे आवाहन त्यांनी केले.
बारामतीत एका खासगी कार्यक्रमात पवार यांनी हा इशारा दिला. पवार म्हणाले, शहरात काही जण चुका करतात. कुठेही कचरा टाकतात, जनावरे चरायला सोडतात. आता अशी मोकाट सोडलेली जनावरे फक्त कोंडवाड्यात घातली आहेत. (Latest Pune News)
नाही ऐकलं तर जनावरांना बाजारच दाखवतो. तुम्ही ऐकले नाही तर गुन्हेच दाखल होतील, असा इशारा पवार यांनी जनावरांच्या मालकांना दिला. गाई, शेळ्या, गाढवे ही जनावरे मोकाट फिरत आहेत. तुम्ही तुमच्या दारात बांधा ना. त्यांना काय खायला प्यायला घालायचे ते तिथे घाला. मी बारामती चांगली करतोय ती सगळ्यांसाठी करतोय. सगळ्यांना मोकळे फिरण्यासाठी नाही, असेपवार म्हणाले.
काही मोटारसायकलवाले इकडे तिकडे बघतात आणि हळूच ओव्हरटेक करतात. चुकीच्या दिशेने जातात. असा माणूस सापडला तर तो कितीही मोठ्या बापाचा असला तर त्याला टायरमध्ये घालून असा झोडायला सांगणार आहे, की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजेत. मग तो कोणी का असेना. अजित पवार असो किंवा अजित पवारांचा नातेवाईक असो, नियम सर्वांसाठी सारखे आहेत, असा दमही अजित पवार यांनी भरला.
मी अनेक ठिकाणी झाडे लावली आहेत, तेथे कोणीही येतंय, शेरडं-करडं झाडे खात आहेत, हे चालणार नाही. या सगळ्या चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजे. त्यांना चांगल्या सवयी लावून घेता येत नसतील, त्यांना त्रास सहन करावा लागेल.
जिथे माणसांना बसण्यासाठी व्यवस्था केली आहे तिथे एक जण मोटारसायकल लावून निवांत गप्पा मारताना दिसला. मी माझी गाडी वळवून घ्यायला सांगितली. पोलिसांना सांगितलं याची गाडी जप्त करा आणि याला चांगला टायरमध्ये घ्या, मग तो चुकलं दादा… चुकलं दादा म्हणतोय. हे चालणार नाही, असे पवार म्हणाले.
हे वागणं बरं नव्हं…
ज्यांच्यामुळे आपण आहोत त्या आई-वडिलांना जपा. मी बारामतीला आलो की आईला भेटतो. मला भरपूर कामे आहेत पण मी रात्रीच आईला भेटलो, दर्शन घेतले. तिच्याशी गप्पा मारल्या. आई-वडिलांशी प्रेमाने वागा, त्यांच्या जीवात जीव असेपर्यंत त्यांना विसरू नका. अलीकडच्या पिढीत काही जण त्यांच्याकडे नीट बघत नाहीत, मी त्यांना सांगतो, हे वागणं बरं नव्हं, असे अजित पवार म्हणाले.
पेपरवाले, टीव्हीवाल्यांनो प्रसिद्धी द्या
मी शहरासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी करतो आहे, पण चुकीच्या दिशेने वाहने नेण्याचे प्रकार घडत आहेत. जिथे बसण्याची व्यवस्था केली आहे, तिथेही स्वच्छता ठेवली जात नाही. झाडे लावली तर ती जनावरे खात आहेत, मी काही बोललो की लगेच बातम्या होतात. पण मी चांगल्या सवयींसाठी आग्रही आहे आणि त्यासाठी मी बोलतो आहे. बाकीच्या बातम्यांना प्रसिद्धी देता तसे माझ्या या म्हणण्यालासुद्धा पेपरवाले, टीव्हीवाल्यांनी प्रसिद्धी द्यावी, असे अजित पवार म्हणाले.