पाऊस धारण करणार रौद्र रुप, IMD चा स्पष्ट इशारा; कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार सरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुलै ।। केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार देशाच्या बहुतांश भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून त्याचा थेट परिणाम आता विविध भागांमध्ये होणाऱ्या जोरदार पावसाच्या स्वरुपात दिसत आहे. इथं महाराष्ट्रातील कोकण आणि घाट क्षेत्रामध्ये पावसाची हजेरी असतानाच तिथं दुसरीकडे हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये परिस्थिती बिघडताना दिसत आहे.

महाराष्ट्रात कसं असेल पुढील 24 तासांसाठीचं हवामान?
राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं उघडीप दिली असली तरीसुद्धा कोकण आणि विविध ठिकाणच्या घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही हवामान विभागानं पावसाचा अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यात पाऊस उघडीप देणं कायम राहणार असल्याचंही हवामान विभागानं स्पष्ट केलं.

बंगालच्या उपसागरामध्ये उत्तरेकडे पुन्हा नव्यानं कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असून, त्याचा प्रामुख्यानं परिणाम मध्य भारतामध्ये दिसून येईल. दरम्यान इथं महाराष्ट्रात कोकणातील किनारपट्टी भागांसह अंतर्गत भागांमध्येसुद्धा पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं ठाणे, पालघर, नांदेड, रत्नागिरी, नाशिक, सातारा घाट क्षेत्र, कोल्हापूर घाट क्षेत्र इथं सावधगिरीचा इशारा देत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तराखंड हिमाचलमध्ये बिघडणार परिस्थिती…
खासगी हवामान संस्था स्कायमेटनं उत्तराखंड- हिमाचल प्रदेशात पावसाचं प्रमाण वाढलं असून, मागील काही दिवसांपासूनच मान्सूननं या भागांमध्ये रौद्र रुप धारण केल. मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा आणि पश्चिमी झंझावात सक्रिय असल्या कारणानं पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहे. ज्यामुळं या उत्तरेकडील राज्यांमध्ये परिस्थिती बिघडणार असून, या भागांमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठीसुद्धा सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय हवामान विभागाच्या इशाऱ्यांवर लक्ष देण्याचा इशारासुद्धा हवामान विभागानं जारी केला आहे.

देशाच्या उत्तरेकडे पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असून, उत्तराखंड आणि हिमाचल क्षेत्रांवर याचा सर्वाधिक परिणाम पाहायला मिळत आहे. ज्यामुळं 13 ते 14 आणि 16 जुलै रोजी देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमद्ये पावसाची तुफान हजेरी पाहायला मिळेल असा इशारा देण्यात आला आहे.

मध्यप्रदेशच्या टिकमगढमध्ये मागील 48 तासांत मुसळधार पाऊस पडला असून, त्यामुळे सर्व तलाव, धरणं तुडुंब भरलीयेत. दरम्यान पुढचे काही दिवस पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *