![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुलै ।। सोशल मीडियावर फिरणार्या एका मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर 2025 पासून एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा देणे बंद करण्याचे आदेश बँकांना दिले आहेत; मात्र केंद्र सरकारने 12 जुलै 2025 रोजी या वृत्ताचे खंडन करत हे वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे.
सतत्या पडताळण्याचे आवाहन
सरकारने सोशल मीडिया वापरकर्त्यांना अशा ‘चुकीच्या माहिती’पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे आणि कोणतीही बातमी शेअर करण्यापूर्वी किंवा त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून तिची सत्यता पडताळून पाहण्याची विनंती केली आहे.
व्हॉटस्अॅपवर कोणता खोटा मेसेज फिरतोय?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देशभरातील सर्व एटीएममधून 500 रुपयांच्या नोटांचे वितरण थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारने काय स्पष्टीकरण दिले?
सरकारच्या ‘पीआयबी फॅक्ट चेक’ या खोट्या माहितीचे खंडन करणार्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने या व्हायरल मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत हा दावा फेटाळून लावला आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, देशाच्या मध्यवर्ती बँकेने बँकांना अशी कोणतीही सूचना जारी केलेली नाही आणि 500 रुपयांच्या नोटा कायदेशीररित्या चलनात राहतील.
