Pune : पुण्याला खरंच ४ वंदे भारत मिळणार का? रेल्वेकडून अधिकृत माहिती जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुलै ।। पुण्यातून चार वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगाव या शहरांसाठी पुण्यातून लवकरच चार वंदे भारत धावतील, असे रिपोर्ट्सनुसार सांगण्यात आले होते, त्याबाबत आता भारतीय रेल्वेकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पुण्याहून कोणत्याही नवीन वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळालेली नाही, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

पुण्याहून शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगावला जोडणाऱ्या चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू होणार असल्याच्या वृत्ताचं भारतीय रेल्वेने खंडन केले. रेल्वेकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे. पुण्यातून चार वंदे भारत सुरू होणार असल्याच्या बातम्या “तथ्यहीन आणि दिशाभूल करणाऱ्या” आहे. रेल्वे प्राधिकरणाने अशा कोणत्याही ट्रेन सेवांना मंजुरी किंवा घोषणा झाली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केलेय.

रेल्वे बोर्ड आणि पुणे विभाग, मध्य रेल्वे यांनी याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले. आतापर्यंत पुण्याहून वंदे भारत सेवांच्या मंजुरी किंवा सुरुवातीसंदर्भात कोणतीही अधिकृत अधिसूचना किंवा प्रसिद्धीपत्रक जारी झालेले नाही. या विरुद्धचे कोणतेही वृत्त अनुमानावर आधारित असून, सक्षम रेल्वे प्राधिकरणाच्या अधिकृत संनादेशावर आधारित नाही, असे रेल्वेने म्हटले आहे.

रेल्वेने चुकीच्या माहितीच्या प्रसाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या बातम्यांमुळे प्रवाशांची दिशाभूल होते, खोट्या अपेक्षा निर्माण होतात आणि भारतीय रेल्वेच्या विश्वासार्हतेचे नुकसान होते, असे म्हटले आहे. माध्यमांनी प्रसिद्धीपूर्वी सर्व माहिती जनसंपर्क विभाग किंवा अधिकृत स्रोतांमार्फत तपासावी, जेणेकरून अचूकता सुनिश्चित होईल, असेही म्हटले आहे. नवीन ट्रेन सेवा, विशेषतः वंदे भारत एक्स्प्रेस, याबाबत कोणतेही अपडेट्स अधिकृत चॅनेल्सद्वारे औपचारिकरित्या कळवले जातील, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *