Pune News: पुणे विमानतळावर सर्वात मोठे ‘मॉक ड्रील’ यशस्वी; अहमदाबाद घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुलै ।। पुणे: अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर शनिवारी (दि.19) सकाळी साडेअकरा वाजता एक मोठे आपत्कालीन मॉक ड्रील यशस्वीरीत्या संपन्न झाले.

या सरावात पुणे विमानतळ प्रशासन, भारतीय वायुसेना, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांसारख्या प्रमुख संस्थांसह पुणे महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, पुणे अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि 108 रुग्णवाहिका यांसह विविध आपत्कालीन यंत्रणांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले, धावपट्टीवर एअरक्राफ्टऐवजी एक बस उभी केली होती. त्या बसमध्ये प्रवाशांना बसवले होते. ठरलेल्या मॉक ड्रिलप्रमाणे आम्ही सर्व यंत्रणांना आग लागल्याची माहिती दिली. अवघ्या काही मिनिटांतच सर्व यंत्रणा धावपट्टीवर हजर झाल्या आणि बचावकार्य सुरू झाले. अहमदाबादप्रमाणे पुणे विमानतळावर एखादी दुर्दैवी घटना घडल्यास आमचे प्रशासन किती सज्ज आहे आणि सर्व यंत्रणा किती अलर्ट आहेत, हे आजच्या मॉक ड्रीलवरून स्पष्ट झाले आहे.

मॉकड्रीलची सुरुवात…
शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास या मॉक ड्रीलला सुरुवात झाली. नियोजनानुसार, सर्व आपत्कालीन यंत्रणांचे इमर्जन्सी फोन नंबर खणाणले आणि पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एका एअरक्राफ्टला भीषण आग लागल्याची माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच एकच धावपळ उडाली आणि निश्चित केलेल्या ’रिस्पॉन्स टाइम’मध्ये सर्व यंत्रणा पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर पोहोचल्या.

अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या मॉक ड्रीलचे आयोजन केले होते. यामध्ये आमच्या सोबत भारतीय वायुसेना, सीआयएसएफ, पुणे महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, पुणे अग्निशमन दल, आरोग्य विभाग, 108 रुग्णवाहिका यांसह अन्य सर्व आपत्कालीन यंत्रणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

– संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *