महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जुलै ।। ‘‘मागील वर्षी गणेशोत्सवामध्ये ज्या अटी व शर्तीवर गणपती उत्सव साजरा झाला, त्याच अटी यावर्षीही लागू असतील. मागील वर्षीची परवानगी यावर्षी चालणार आहे. कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत. गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि भयमुक्त असेल,’’ अशी ग्वाही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा-२०२४ पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी आमदार हेमंत रासने, डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
कुमार म्हणाले की, गणेशोत्सवात अडथळा निर्माण होईल, असे काहीही घडू दिले जाणार नाही. वाहतूक व्यवस्थापन, कायदा आणि सुव्यवस्था तसेच, महिला सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. त्यासाठी संपूर्ण नियोजनबद्ध बंदोबस्त उभारण्यात येईल. जो शांतता सुव्यवस्थेला बाधा आणेल, त्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाईल.
मागील वर्षी पुण्यातील गणेशोत्सवाचा अनुभव घेतला. पुण्याच्या गणपतीचे स्वरूप खूपच विशाल आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी होतात. त्यातच राज्य सरकारने यंदाचा गणेशोत्सव राज्योत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक होणार असून, त्यासंदर्भात शहरातील सर्व गणेश मंडळांशी लवकरच बैठका घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणेकर, थोरात यांनी आपले मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन महेश सूर्यवंशी यांनी केले.