महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जुलै ।। जागतिक आणि भारतीय बाजारात सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सोन्याच्या प्रति ग्रॅम किमती इतक्या वाढल्या आहेत की सर्वसामान्यांना सोन्याच्या दागिन्यांची खरेदी परवडेना झाली आहे. अशा परिस्थितीत, लोक महागड्या 22 किंवा 18 कॅरेटच्या दागिन्यांऐवजी स्वस्त 9 कॅरेटचे सोन्याचे दागिने खरेदी करण्याकडे वळत आहेत. कमी कॅरेटचे सोन्याचे दागिने खरेदी करणे लोकांना चांगले वाटत आहे कारण त्यामुळे खिशावर कमी भार पडतो.
लोकांच्या अलीकडच्या खरेदीचा कल पाहता आता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या BIS 9 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंग अनिवार्य असल्याची घोषणा केली आहे. म्हणजे आता ग्राहकांना कमी कॅरेटचे स्वस्त सोने खरेदी करतानाही शुद्धतेची हमी मिळेल. जुलै 2025 पासून देशभरात हा नियम लागू केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
स्वस्त सोन्यावर हॉलमार्क अनिवार्य
सोन्याच्या किमती सतत वाढत आहेत. गेल्या आठवड्यात शुक्रवारी, 18 जुलै रोजी 24 सोन्याचा 10 ग्रॅम भाव 99,520 रुपयांवर पोहोचला. अशा स्थितीत, लोक 9 कॅरेटचे सोने खरेदीकडे वळत आहेत जे, 22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या तुलनेत खूप स्वस्त असते. अशा स्थितीत, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी संस्था ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने 9 कॅरेट सोन्यावरही हॉलमार्क अनिवार्य केले आहे.
BIS च्या ताज्या घोषणेनुसार, हॉलमार्किंगमध्ये आता ‘हे’ ग्रेड असतील : 24 KF, 24 KS, 23K, 22K, 20K, 18K, 14K आणि 9K. 9 कॅरेट सोन्यात प्रति हजार किमान 375 भाग असला पाहिजे. म्हणजे, 9 कॅरेट सोने 37.5% शुद्ध आहे. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की सर्व ज्वेलर्स आणि हॉलमार्किंग सेंटरना BIS नियमांचे पालन करावे लागेल.
9 कॅरेट हॉलमार्किंगचे फायदे
9 कॅरेटच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगचा फायदा मध्यमवर्गीयांना होईल. कमी किमतीमुळे लोक 9 कॅरेट सोन्याची निवड करत आहेत.
यामुळे आता 9 कॅरेटच्या सोन्यातही शुद्धतेची हमी मिळेल. 9 सोने 37.5 टक्के शुद्ध मानले जाते.
9 कॅरेटचे हॉलमार्किंग फसवणूक टाळण्यास मदत करेल.
गुणवत्ता नियंत्रणामुळे विश्वास निर्माण होतो.
हॉलमार्किंगमुळे ब्रिटन आणि युरोपमध्ये 9 कॅरेट सोन्याचे दागिने विकणे सोपे होईल.