महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 22 जुलै ।। राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या गेम खेळण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. मंत्र्यांच्या कारनाम्यांवरून शिवसेना ठाकरे गटाकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जातेय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. विधिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात कोकाटे यांना रमी खेळताना दिसल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर हे प्रकरण तापलं आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, महाराष्ट्र सरकारचा आता कोठा झालाय आणि या कोठ्याची हमीदाबाई दिल्लीत बसून सगळ्यांनाच नाचवतेय.
एका बाजूला शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असताना, दुसऱ्या बाजूला मंत्री रमी खेळण्यात मग्न आहेत. हे सरकार रंगेल आणि रगेल लोकांनी व्यापले आहे. नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणापासून ते विधानसभेतील रमी खेळीपर्यंत सगळं काही उघड झाले आहे. दिल्लीतील हमीदाबाई महाराष्ट्रातील नेत्यांना नाचवत आहेत. यामुळे राज्यातील जनतेचा विश्वास सरकारवरून उठला आहे अशा शब्दात राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आलीय.
अग्रलेखात पुढे असं म्हटलंय की, फडणवीसांचे सरकार हे कडवट हिंदुत्ववादी वगैरे आहे असे सांगितले जाते. त्यामुळे सत्तेवर येण्याआधी त्यांनी पंचांग पाहून मुहूर्त काढला असेलच. सरकारातील काही जणांनी तर आसामच्या कामाख्या मंदिरात अघोरी पूजा करून सत्तेत प्रवेश केला, पण या सगळ्यांचा मुहूर्त चुकलेला दिसतो. मंत्र्यांचे उपद्व्याप आणि प्रताप ज्या पद्धतीने समोर येत आहेत ते पाहता लवकरच मंत्रिमंडळाचे पत्ते पिसावे लागतील व पाच ते सहा मंत्र्यांना लाथ मारून घरी बसवावे लागेल. राजकीय वर्तुळात अशा मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. संजय शिरसाट, योगेश कदम, माणिक कोकाटे, दादा भुसे, संजय राठोड व नाशिकच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या पाच मंत्र्यांपैकी काहींना जावे लागेल. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सध्या जो ‘रम, रमा, रमणी’चा खेळ चालला आहे, त्यात भाजपचे मंत्रीही नक्कीच आहेत. गिरीश महाजन यांचा खासमखास प्रफुल लोढा याच्यावर ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात गुन्हे दाखल झाले. मुंबई (साकीनाका, अंधेरी पोलीस स्टेशन), नाशिक, जामनेर येथे पोलिसांनी गुन्हे दाखल केले व लोढाच्या घरांवर धाडी घालून त्यांच्याकडील सीडी, पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी शर्थ करीत आहेत. यात सध्याच्या सरकारातील मंत्र्यांची रहस्ये आहेत असंही सामनाच्या लेखात म्हटलं आहे.
राज्य सरकारवर घणाघाती टीका करताना मंत्री वेगवेगळ्या भानगडीत अडकल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रंगेल व रगेल लोक आले आहेत. एक मंत्री भर विधानसभेत रमीचा डाव टाकतोय, दुसरा मंत्री पैशांच्या बॅगांचे प्रदर्शन करीत सिगारेट फुंकतोय, तिसरा मंत्री आपल्या प्रेयसीचा खून पचवून फडणवीसांच्या बाजूला बसलाय, चौथा मंत्री नाशिकच्या हनी ट्रॅपच्या सापळ्यातून सुटण्याची धडपड करतोय, पाचवा मंत्री दुसऱ्यांना अडकवत असताना स्वतःच हनी ट्रॅपच्या गुंत्यात फसलाय. ‘रम, रमी, रमणी’च्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय! कोठ्याच्या हमीदाबाई दिल्लीत बसून सगळ्यांनाच नाचवीत आहेत अशी टीका करण्यात आलीय.