महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै ।। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती झाली आहे. त्यानंतर आता पुढचा म्हणजे १३वा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. दरम्यान, येत्या ८ दिवसांतच महिलांच्या खात्यात जुलैचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. जुलैअखेर किंवा पुढच्या महिन्याच्या ५ तारखेपर्यंत पैसे जमा होतील, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जुलैचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana July Month Installment Date)
लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. दरम्यान, जूनपर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलैच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहे. जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या ५ तारखेपर्यंत हे पैसे दिले जाण्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले जात आहे.
जुलै महिना संपायला अवघे ८ दिवस उरले आहेत. त्यामुळे या दिवसात कधीही खात्यात पैसे जमा होतील. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्येक महिन्याचा हप्ता लांबणीवर जात आहे किंवा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला जातो. त्यामुळे यावेळीही या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जातील, असं सांगण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती (Ladki Bahin Yojana 1 Year Complete)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही योजना राबवण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत २ कोटींपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी होत आहे. त्यातून अनेक अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत.
लाडकी बहीण योजनेत जवळपास १० लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहेत. त्यानंतर आता निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केल्यानंतर आता नवीन यादी तयार करण्याचे आदेश महिला व बालविकास विभागाला देण्यात आले आहेत. त्यानंतर यादी तयार केली जाईल.