Mumbai 26th July : मुंबईकरांनो २६ जुलैचा समुद्रकिनारी जाणं टाळा, IMD कडून मुसळधारेचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जुलै ।। मुंबईतील २६ जुलै २००५ च्या प्रलयंकारी पावसाला आज दोन दशकं झाली. त्या भयानक दिवसाच्या आठवणी आजही मुंबईकरांच्या डोक्यात कायम आहेत. आजही मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय समुद्रात मोठ्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आज गरज नसेल तर घराबाहेर पडूच नये, त्याशिवाय समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईमध्ये आज मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. आज समुद्रात सर्वात मोठ्या भरतीचा इशारा देण्यात आला आहे. दुपारी एक वाजता समुद्रात मोठी भरती अन् लाटांचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समुद्राला उधाण आल्यामुळे मुंबईवर पुन्हा एकदा २० वर्षांपूर्वीचाच धोका जाणवत आहे. आजही पावसाने धुमाकूळ घातल्यास मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज नसेल, तर घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मुंबईतील तो भयानक दिवस –
२० वर्षांपूर्वी २६ जुलै रोजी मुंबईवर निसर्गानं अक्राळविक्राळ तांडव केलं होतं. अवघ्या 24 तासांत मुंबईत 944 मिमी पाऊस पडला होता. जो शंभर वर्षांतील सर्वाधिक पावसाचा विक्रम ठरला. आजच्याच दिवळी 20 वर्षांपूर्वी जवळपास 1 हजार पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. 37 हजार रिक्षा, 4 हजार टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेस जलमय झाल्या. हजारो घरं उद्ध्वस्त झाली आणि कोट्यवधी रुपयांचं आर्थिक नुकसान झालं. संपूर्ण शहर थांबून गेल होतं. आणि नागरिकांच्या मनात कायमची एक भीती निर्माण झाली.

मुंबईकरांसाठी पुढील चार तास महत्त्वाचे –
मागील दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आजही सकाळपासून मुंबईमध्ये संततधार सुरूच आहे. मुंबई आणि उपनगराला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघरमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार तासांत मुंबई आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत पावसाचा जोर कायम, दुहेरी संकट –
आज मुंबईत पावसाचा जोर कायम आहे, पण २००५ च्या तुलनेत परिस्थिती नियंत्रणात आहे. आज, २६ जुलै रोजी, दुपारी १२:३५ वाजता ४.६७ मीटर उंचीची सर्वात मोठी भरती येणार आहे, ज्यामुळे सखल भागात पाणी साचण्याचा धोका आहे. पालिकेने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई आणि उपनगरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. त्यामुळे जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. २००५ नंतर मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपत्ती व्यवस्थापनात सुधारणा केल्या आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये पनवेल, वसई-विरार, विलेपार्ले आणि कल्याण-डोंबिवली येथे चार एक्स-बॅंड रडार बसवण्यात आले. त्यामुळे पावसाचा अंदाज सहा तास आधीच समजतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *