महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुलै ।। गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवसदेखील हवामानात फारसा बदल होणार नसल्याने हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता असून, तिथे सोमवारी (ता. २८) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २७) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी सहापासून पावसाने हजेरी लावली होती. दुपारी उशिरापर्यंत शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाची संततधार सुरू होती. त्यानंतर मात्र दुपारी तीननंतर पावसाने विश्रांती घेतली.
रविवारी शहरात २७ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान तर २१.९ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. घाट विभागात मात्र पावसाचा जोर कायम आहे. घाट विभागातील ताम्हिणी परिसरामध्ये गेल्या २४ तासात २८० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.