महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुलै ।। अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ साठीचा पाचवा कसोटी सामना ३१ जुलैपासून दी ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि चौथी कसोटीत अनिर्णित राखून टीम इंडियाने आव्हान अजूनही कायम ठेवले आहे. पण, इंग्लंडचा संघ हार मानणारा नाही आणि त्यांनी पाचव्या कसोटीसाठी ‘त्याला’ पुन्हा बोलावले आहे. इंग्लंडने पाचव्या कसोटीसाठी त्यांचा संघ जाहीर केला आहे.
इंग्लंडने जाहीर केलेल्या संघात एक बदल करण्यात आला आहे आणि वेगवान गोलंदाज अष्टपैलू जेमी ओव्हरटन संघात परतला आहे. या मालिकेतील पहिल्या तीन कसोटी सामन्यांसाठी ओव्हरटन संघाचा भाग होता, परंतु मँचेस्टर कसोटीपूर्वी त्याला संघातून वगळण्यात आले. त्याला सरे क्लबकडून काऊंटी क्रिकेट खेळता यावे, यासाठी हा निर्णय घेतला गेला होता. आता ३१ वर्षीय ओव्हरटनने पुन्हा इंग्लंडच्या संघात परतला आहे.
जेमी ओव्हरटनने इंग्लंडकडून १ कसोटी सामन्यांत २ विकेट्स घेतल्या आहेत आणि ९७ धावांची खेळी केली आहे. त्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनमध्ये परतल्यास इंग्लंडची फलंदाजी मजबूत होईलच शिवाय त्यांच्याकडे अतिरिक्त जलदगती गोलंदाज उपलब्ध असेल, जो भारतीय फलंदाजांना हैराण करू शकतो. ओव्हरटनने ९८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३१.२३ च्या सरासरीने २३७ विकेट्स घेतल्या आहेत आणि २१.८२ च्या सरासरीने २४०१ धावा केल्या आहेत.
पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॅक क्रॉली, लियाम डॉसन, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.
भारतीय संघात बदल अपेक्षित…
रिषभ पंतला दुखापतीमुळे पाचव्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे दी ओव्हल कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल अपेक्षित आहे. जसप्रीत बुमराह खेळणार की नाही, हाही प्रश्न आहेच. कारण वर्कलोडच्या व्यवस्थापनामुळे तो या दौऱ्यावर फक्त तीन कसोटी खेळणार होता आणि तो त्या खेळून झाल्या. अर्शदीप सिंग व आकाश दीप यांना दुखापतीमुळे चौथ्या कसोटीला मुकावे लागले होते. त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग.