महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुलै ।। 2025 मध्ये सोन्याने (Gold) नवा उच्चांक गाठला आहे. फक्त सहा महिन्यांत सोन्याने तब्बल 27 टक्के परतावा (Return) दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. तरीसुद्धा, तज्ज्ञ सध्या पुढील पाच महिन्यांत सोने खरेदी करु नका असा सल्ला देत आहेत.
सोनं हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकप्रिय आहे. मेहता इक्विटीज लिमिटेडचे उपाध्यक्ष (कमॉडिटी) राहुल कलंत्री यांच्या मते, सोन्याने 2025 च्या पहिल्या सहामाहीत गुंतवणूकदारांना 27 टक्के तर एप्रिल 2025 पासून तब्बल 33 टक्के परतावा दिला आहे.
परंतु, जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारल्याने आणि मागणी स्थिरावल्याने सोन्याच्या किमती काही काळ घसरण्याची शक्यता आहे. अशावेळी गुंतवणूकदारांनी घाईने नवीन गुंतवणूक न करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
सोन्याचे भाव एवढे का वाढले?
अलिकडच्या काळात सोन्याच्या भाव वाढीमागे काही महत्त्वाचे घटक आहेत:
विकसनशील अर्थव्यवस्थांमधील सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली.
जागतिक पातळीवर भू-राजकीय तणाव वाढला.
अमेरिकन डॉलर इंडेक्स कमकुवत झाला आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षा वाढल्या.
गोल्ड ETF मध्ये गुंतवणुकीत वाढ आणि भारत-चीनमध्ये किरकोळ मागणी वाढली.
चांदीत गुंतवणुकीचा पर्याय
राहुल कलंत्री यांच्या मते, अल्पकालीन गुंतवणूकदारांनी पोर्टफोलियोतील काही हिस्सा चांदीत (Silver) गुंतवण्याचा विचार करावा. औद्योगिक वाढ आणि आर्थिक विस्तारामुळे चांदीत अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.
मोतीलाल ओसवाल फिनान्शियल सर्व्हिसेसचे वरिष्ठ विश्लेषक मानव मोदी यांचेही मत असेच आहे – सोन्याच्या किमती काही काळ स्थिर किंवा घसरणीच्या दिशेने जाऊ शकतात आणि त्यानंतरच पुन्हा वाढ दिसू शकते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही योग्य संधी ठरू शकते, पण अल्पकालीन गुंतवणुकीसाठी सावध राहणे आवश्यक आहे.
नोंद: गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी नेहमी प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. बाजारातील जोखीम समजून जबाबदारीने गुंतवणूक करा.