Donald Trump: पाकिस्तानला गोंजारत ट्रम्प यांच्याकडून भारताला धक्का ; म्हणाले – इंडियाला PAK कडूनही तेल खरेदी करावे लागेल…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जुलै ।। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या टॅरिफमुळे चांगलेच चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टेरिफ लावला. भारतावर टॅरिफ लादण्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानबद्दल एक मोठी घोषणा केली. ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत व्यापार करार केला ज्याअंतर्गत ते दक्षिण आशियाई देशाच्या तेल साठ्यांचा विकास करण्यासाठी पाकिस्तानसोबत काम करतील. ट्रम्प यांनी पहिल्यांदाच पाकिस्तानसोबत मोठ्या तेल कराराची ही घोषणा केली. ट्रम्प यांनी सांगितले की, ‘अमेरिका आणि पाकिस्तान एकत्रितपणे ‘मोठा तेल साठा’ विकसित करतील.’ ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, ‘कदाचित भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकेल.’

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर ही घोषणा केली. एक दिवस येईल जेव्हा भारत देखील पाकिस्तानकडून तेल खरेदी करेल, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे त्यामुळे सध्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले की, आम्ही पाकिस्तानसोबत एक करार अंतिम केला आहे. ज्या अंतर्गत अमेरिका आणि पाकिस्तान एकत्रितपणे त्यांचे तेल साठे विकसित करतील. या भागीदारीचे नेतृत्व कोणती अमेरिकन तेल कंपनी करेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण कुणाला माहित आहे की कदाचित एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल.’

दुसरीकडे पाकिस्तानसोबतच्या कराराबाबत घोषणा करण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. याशिवाय त्यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त दंडात्मक कारवाई करण्याबद्दलही सांगितले. ट्रम्प म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार चर्चा अजूनही सुरू आहेत आणि आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती स्पष्ट होईल.

ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये ब्रिक्सबद्दलही नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, ‘भारत हा अमेरिकाविरोधी गटाचा एक भाग आहे.’ त्यांनी ब्रिक्सला अमेरिकन डॉलरवरील हल्ला म्हटले. त्यांनी असेही म्हटले की, अमेरिका कोणत्याही परिस्थितीत हे होऊ देणार नाही. व्हाईट हाऊसमधील त्यांच्या ‘व्यस्त दिवस’चा संदर्भ देत ट्रम्प म्हणाले की, ‘ते जगातील अनेक देशांच्या नेत्यांना भेटत आहेत जे अमेरिकेला कर सवलत देत आहेत.’ त्यांनी पुढे असा दावा केला की, ‘या प्रयत्नांमुळे अमेरिकेची व्यापार तूट मोठ्या प्रमाणात कमी होईल.’

ट्रम्प’नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?

फार्मास्युटिकल्स – अमेरिका हे भारतासाठी सर्वात मोठे जेनेरिक औषधांचे बाजार आहे. २०२४ मध्ये भारताची औषध निर्यात १२७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. नव्या टॅरिफमुळे भारतीय जेनेरिक औषधांचे दर वाढतील व विक्री होईल. याचा भारतीय फार्मा उद्योगावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

शेती आणि सीफूड : ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या अहवालानुसार मत्स्य, मांस आणि प्रक्रिया केलेल्या सीफूड निर्यातीवर सर्वाधिक परिणाम होईल. २०२४ मध्ये भारताची या क्षेत्रातील निर्यात सुमारे २.५८ अब्ज डॉलर्स होती, ज्यावर २७.८३% पर्यंतचा अतिरिक्त टॅरिफ लागू होण्याची शक्यता आहे.

पादत्राणे उद्योग : भारतीय पादत्राणे उद्योग दरवर्षी अमेरिकेला ४५.७६ कोटी डॉलर्सची निर्यात करतो. यावर १५% आयात शुल्क लागायचे, परंतु ते २५% होणार आहे. यामुळे भारतीय फुटवेअर महाग होऊन, ग्राहक दुसऱ्या देशांची उत्पादने पसंत करतील. परिणामी भारताची निर्यात घटेल.

स्मार्टफोन, आयफोन निर्मिती : भारतात स्मार्टफोन, आयफोन निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातील बहुतेक आयफोन हे अमेरिकेत निर्यात होतात. त्यावर २५% टॅरिफ लागल्याने आयफोन निर्मिती उद्योगाला फटका बसेल. अमेरिकत भारतातील आयफोन महाग होतील.

दरम्यान, अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी द्विपक्षीय व्यापाराबाबत केलेल्या वक्तव्याची भारत सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या निर्णयाचे संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलेल आणि याआधी युकेसोबतच्या करारासारखेच प्रयत्न केले जातील असं भारत सरकारने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *