कोकाटेंची कमतरता भरणेंनी भरली ; २४ तासांच्या आत नव्या कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑगस्ट ।। माणिकराव कोकाटे यांची कमतरता नवीन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अवघ्या २४ तासात भरून काढली आहे. कृषिमंत्रिपदाचा कारभार हातात घेताच २४ तासांच्या आत भरणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एकादं काम वाकडं करून परत सरळ करता येते. वाकडं काम करतात, त्यांचीच नोंद माणसं ठेवतात, असे वक्तव्य दत्ता भरणे यांनी केलेय. कृषिमंत्री दत्ता भरणे यांचा हा अजब सल्ला इंदापूरमध्ये चर्चेत आहे.

राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे वादग्रस्त विधानाने अडचणीत येण्याची शक्यता आहे. महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात एक अजब आणि वादग्रस्त विधान करून उपस्थितांचे कान टवकारले. महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले की, “सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात.” या विधानाने कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

महसूल दिनासारख्या गंभीर प्रसंगी कृषिमंत्र्यांकडून अशी मांडणी होणे, हे अनेकांना पचनी पडले नसावे. महसूल विभागाकडून पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा अपेक्षित असताना, मंत्र्यांनी “काम वाकडं करून परत सरळ करण्याचा” सल्ला दिल्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भरणे यांनी पुढे शेतकऱ्यांच्या तक्रारींना वेळीच न्याय मिळावा आणि योजनांचा लाभ योग्य हक्कदारांपर्यंत पोहोचावा, असेही सांगितले. मात्र त्यांच्या अजब विधानामुळे मंत्री महोदय अडचणी येण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगणार असून , कृषिमंत्री पदाची जबाबदारी नुकतीच स्वीकारलेल्या भरणे यांनी अशा स्वरूपाचे मार्गदर्शन करणे कितपत योग्य? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *