Pune Bopdev Ghat : पुण्यातील २२ टेकड्या होणार हायटेक, ७० कोटींचा सुरक्षा प्रकल्प

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑगस्ट ।। पुण्यातील बोपदेव घाट परिसरात घडलेल्या भीषण सामूहिक अत्याचार प्रकरणानंतर पुण्यातील टेकड्यांवरील सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आणि गृह विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत २२ प्रमुख टेकड्यांवर अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ७० कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शहरातील वेताळ टेकडी, पर्वती, चतुःशृंगी, तळजाई, लॉ कॉलेज टेकडी, सेनापती बापट रस्ता, पाषाण, बोपदेव घाट अशा प्रमुख टेकड्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी आता पारंपरिक सुरक्षेच्या मर्यादा ओलांडत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक टेकडीवर हाय रिझोल्यूशन IP-आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, जे थेट नियंत्रण कक्षाशी जोडलेले असतील.

सुरक्षेच्या दृष्टीने टेकड्यांवर पॅनिक बटण (भोंगा) ही व्यवस्था असेल, जे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना तत्काळ सूचना देऊ शकेल. IP स्पीकर्सद्वारे वेळोवेळी सूचना प्रसारित होतील आणि रात्रीच्या वेळी सुरक्षिततेसाठी फ्लडलाइट्स बसवले जातील. या संपूर्ण यंत्रणेला भूमिगत फायबर इंटरनेट आणि विजेच्या जोडण्या दिल्या जातील, जेणेकरून कुठलीही अडचण निर्माण होणार नाही.

सध्या बोपदेव घाट परिसरात या योजनेच्या अंमलबजावणीस युद्धपातळीवर सुरुवात झाली असून इतर टेकड्यांवरही लवकरच काम सुरू होईल. या निर्णयामुळे नागरिकांना टेकड्यांवर फिरताना अधिक सुरक्षित वाटेल आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे मोठं पाऊल मानलं जात आहे. पुणे शहराची निसर्गसंपन्न ओळख जपत, त्याचवेळी नागरिकांची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल निश्चितच सकारात्मक आणि आश्वासक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *