महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०५ ऑगस्ट ।। पुण्यात गुन्हेगारी वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच सिंहगडरोडवर २ टोळ्यांमध्ये किरकोळ वादातून चक्क भरपरिसरात गोळीबाराचा प्रकार घडला आहे. भरचौकात दोन गावठी पिस्तूलांतून सलग तीन राऊंड फायरिंग झाली. यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेने शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.
सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी चौकात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, एका वाहनाला गाडी घासल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. काही क्षणांतच बाचाबाची हाणामारीत परिवर्तित झाली. वाद इतका टोकाला गेला की दोघांनी गावठी कट्टे काढून फायरिंग सुरू केली. गोळ्या संपल्यानंतर आरोपींनी पिस्तूल उलट्या बाजूने मारहाण केली. यामध्ये काही जण जखमी झाले असून सुदैवाने कोणालाही गोळी लागलेली नाही.
या संपूर्ण घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सायंकाळची वर्दळीची वेळ, आजूबाजूला दुकाने, हॉटेल्स, खाजगी क्लासेस आणि बसथांबे असल्याने मोठी दुर्घटना घडली असती, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात.
खडकवासला परिसर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भररस्त्यात खुलेआम फायरिंग होत असेल तर, पोलीस यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेमागे पूर्ववैमनस्य आहे का, की इतर कोणतेही गुन्हेगारी कारण, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. नांदेड सिटी पोलिसांसह गुन्हे शाखा पथकानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे.