महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०५ ऑगस्ट ।। गणेशोत्सवात मानाच्या गणपतींसह अन्य प्रमुख मंडळांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नेहमीच हजेरी लावतात. बहुतांश व्यक्तींचा ताफा सायंकाळनंतर शहरात दाखल होतो. त्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मंडळालगतचा परिसर तसेच महत्त्वाचे रस्ते बॅरिकेड लावून बंद करण्यात येतात.
त्यामुळे शहरातील महत्त्वाचे रस्ते तसेच चौक बंद होत असल्याने त्याचा त्रास गणपती देखावे पाहण्यासाठी आलेल्या भक्तांना होतो. त्यामुळे गणेशोत्सवात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी चारच्या आत दर्शन घ्यावे, असे आवाहन सोमवारी (दि. 4) गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आले.
पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या वतीने गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्वारगेट येथील हिंदुहृदयस श्री बाळासाहेब ठाकरे व्यंग्यचित्रकार कलादालनाच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीवेळी रवींद्र माळवदकर, श्रीकांत शिरोळे, अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, शिरीष मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी शहरातील विविध मंडळांच्या पदाधिकार्यांनी आपले मत व्यक्त केले.
मान्यवरांच्या दौर्यांसाठी रस्ते व रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्याच्या प्रकारांमुळे शहराच्या पूर्व भागाकडील गणेशोत्सव मंडळांचे देखावे पाहण्यासाठी भाविक जाऊ शकत नाहीत. परिणामी, दिवस-रात्र मोठ्या कष्टाने उभे केलेले देखावे पाहण्यासाठी नागरिक फिरकत नसल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड होतो. याच कारणामुळे पूर्व भागातील बर्याच मंडळांनी गेल्या काही वर्षांपासून भव्यदिव्य देखावे न करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरू राहिल्यास नागरिकांची गैरसोय टळेल.
दरवर्षी सकाळी दहा वाजता मिरवणूक सुरू झाल्यानंतर रात्री नऊपर्यंत विसर्जन होईपर्यंत अवघी दहा ते बारा मंडळे जातात. त्यानंतर त्याच वेळेत दोनशेहून अधिक मंडळे जातात, हा मोठा विरोधाभास आहे. मानाची मंडळे दहा वाजता निघतात.
मात्र, त्यांना रात्री नऊ वाजतात. त्याचे कारण शोधण्याची गरज आहे. उर्वरित मंडळांमध्ये जागा राहिली, तर पोलिस काठ्या वाजवत मंडळ पुढे घेण्यास सांगतात. मात्र, मानाच्या मंडळांसाठी लागणार्या वेळेबाबत कोणी बोलत नाही. त्यामुळे छोट्या मंडळांसोबत भेदभावाची वागणूक कशासाठी? असा सवालही उपस्थित करण्यात आला.
छोट्या मंडळांनाही मिळावा मानपान
यंदाच्या वर्षी काही मंडळांनी मानाच्या गणपतीपाठोपाठ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे अन्य मंडळांनीही सकाळी सातच्या सुमारास मिरवणुकीस सुरुवात करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
आमची मंडळेही सकाळी सातच्या सुमारास मिरवणुकीत सहभागी होतील. त्यामुळे प्रशासनाने आमच्या मंडळाचा आदर करण्याची आवश्यकता आहे. मानाच्या गणपतीच्या मंडळांनी मानपान स्वीकारत मिरवणुकीत सहभागी होण्यास आमची काही हरकत नसल्याचे मतही या वेळी व्यक्त करण्यात आले.
बैठकीत कार्यकर्त्यांचे हे मुद्दे ठरले लक्षवेधी
बाप्पाची विसर्जन मिरवणूक सकाळी सात वाजता सुरू व्हावी.
विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टिमचा वापर कमी करावा.
काळानुसार खूप गोष्टी बदलतात, याचा स्वीकार करायला हवा.
मध्यवर्ती भागातील रस्त्यांचा आग्रह न धरता परिसरात मिरवणूक काढावी.
कलाकारांना ठरलेल्या रकमेनुसार मानधन अदा करण्यात यावे.
गणेशोत्सव हा कार्यकर्त्यांचा असल्यामुळे कार्यकर्त्यांनी नियोजन करणे गरजेचे.