महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ ऑगस्ट ।। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सध्या अॅक्शन मोडमध्ये आहेत. आज पहाटे ५.४५ वाजता त्यांनी थेट चाकण चौक परिसरात जाऊन वाहतूक कोंडीची पाहणी केली. पुणेकर वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत. हिंजवडी आणि चाकण हे आयटी आणि ऑटो हब असून, येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं आणि वाहतूक कोंडी आहे. यावर स्थानिक ग्रामपंचायती उपाय करण्यास असमर्थ असल्याने, उपमुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेत तीन नव्या महापालिकांच्या स्थापनेची घोषणा केली आहे.
पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवार म्हणाले, ‘आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीनं दौरा केला आहे. पहाटे ५: ४५ वाजता दौऱ्याला सुरूवात केली. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे, त्यासाठी निधी ही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग करुयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही’, असं अजित पवार म्हणाले.
तसेच वाहतूक कोंडीतून सुटका करून देणार असल्याचं अजित पवार म्हणाले, ‘तुम्ही आतापर्यंत खूप त्रास सहन केला आहे. तुम्ही सहनशीलता दाखवली. पण यातून आता सुटका करूयात. चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे. काहींना आवडेल न आवडेल, पण हे करावं लागेल’, असं अजित पवार म्हणाले. पुणे जिल्ह्यात नव्यानं तीन महापालिका कराव्या लागणार, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका. चाकण आणि हिंजवडी भागातही महापालिका करावी लागणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे विकासाच्या दृष्टीनं लवकरच पुण्याला आणखी तीन महापालिका मिळणार आहे. यामुळे सामान्य जनतेच्या बऱ्याच प्रश्न सुटतील.