![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ ऑगस्ट ।। सध्या राज्यात हवामानाचे दोन्ही टोकं पाहायला मिळत आहेत. काही भागात कडाक्याचं ऊन पडत असतानाच अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बीड जिल्ह्यांसह काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित राज्यात हलक्याफुलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, आज ८ ऑगस्ट रोजी राज्यातील विविध भागांमध्ये हा मिश्र स्वरूपाचे हवामान राहिल. काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल. तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसतील. कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास असू शकते. त्यामुळे मासेमारांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये पहाटेपासून रिमझिम सरी कोसळत आहे. पुण्यात पावसाचा जोर कायम आहे. पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, पुढील ३ तासात नांदेड, बीड, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे , सोलापूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात कुठे- कुठे कोसळधार
हिंगोलीत पावसानं जोरदार बॅटिंगला सुरूवात केली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बन, बरडा, वझर या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यानं जनजीवन विसकळीत झालं आहे. तसेच परिसरातील पावसाच्या पाण्यामुळे हाल होत आहे. आज पहाटे ५ वाजता सुरू झालेला पाऊस तब्बल तीन तास सलग कोसळत आहे. तसेच कयाधू नदी दुथडी वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे.
