महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ ऑगस्ट ।। आज रक्षाबंधन असून सकाळपासूनच मान्सूनने जोर दाखवला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागात पावसाची कमतरता जाणवत होती, मात्र आज काही राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.
महाराष्ट्रातील आजचे हवामान
मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे; विशेषतः मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. हवामान खात्याने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत सकाळपासूनच हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस सुरू असून वातावरण दमट आणि ढगाळ आहे. मुंबई-ठाणे प्रांतातही पुढील २४ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, आणि पुढील 5 दिवसांत पावसाचा आकडाही वाढेल.
ऑगस्टच्या मधून राज्यभर पुन्हा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. कोकण, मुंबई, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यात विशेष प्रभाव दिसू शकतो, विशेषतः शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरू शकतो.
गेल्या 24 तासांचा पाऊस
तेलंगणामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. दक्षिण छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश, गंगीय पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, पूर्व आसाम आणि अंडमान-निकोबारमध्ये हलक्या ते मध्यम सरींसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. जम्मू-काश्मीर, मराठवाडा आणि कोकण-गोव्यातही पाऊस नोंदवला गेला.
मान्सून ‘ब्रेक’ची स्थिती
ऑगस्टच्या सुरुवातीला वेग पकडलेला मान्सून सध्या देशाच्या अनेक भागांत मंदावला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, ऑगस्ट महिन्यात साधारणपणे ‘ब्रेक-इन-मॉन्सून’ची परिस्थिती निर्माण होते, जी साधारण १० दिवस टिकते. १ जून ते ७ ऑगस्टदरम्यान सरासरी पाऊस ११५ टक्क्यांवरून १०२ टक्क्यांपर्यंत घसरला आहे आणि पुढील चार दिवसांत आणखी घट होण्याची शक्यता आहे.
पश्चिम आणि मध्य भारतातील गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि मध्य प्रदेशात काल पाऊस झाला नाही. दक्षिण भारतात केवळ कर्नाटकाचा दक्षिण भाग, रायलसीमा, केरळ आणि तमिळनाडूच्या आतील भागांत हलक्या सरी कोसळल्या. ईशान्य भारत, जो नेहमी पावसासाठी ओळखला जातो, तिथेही पावसाचा तुटवडा आहे. मात्र पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा आणि विदर्भाच्या काही भागांत चांगला पाऊस नोंदवला गेला.