राज्यात ‘हे’ जिल्हे वगळता उर्वरित भागात पावसाळी उन्हाळा…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑगस्ट ।। हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तूर्तास जोरदार पावसाचा इशारा नसून काही भागांमध्ये तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी पारा तीस अंशांपलिकडे पोहोचत असल्या कारणानं पावसाच्या या दिवसांमध्ये उन्हाळा सुरू झाल्याचीच अनुभूती होत आहे. अशा या संपूर्ण वातावरणादरम्यान राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ भाग मात्र अपवाद ठरत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्यानं धाराशिव, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसतील. तर, उर्वरित जिल्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज आहे.

मुंबई आणि कोकणात जाणवतोय उकाडा…
मुंबई आणि कोकणामध्ये प्रामुख्यानं किनारपट्ट भागांमध्ये हवेत आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यानं उष्मा अधिक जाणवू लागला आहे. ज्यामुळं या पावसाळी उन्हाळ्यानं नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम केल्याचं पाहायाला मिळत आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळत असून या बदलत्या हवामानात नागरिकांना आरोग्य जपण्याचा सल्लाही दिला जात आहे.

तज्ज्ञ म्हणतात पाऊस येणार…
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार 13 ऑगस्टच्या सुमारास बंगालच्या उपसागरात वायव्येस कमी दाबाच्या प्रणालीची शक्यता आहे. ज्यामुळं राज्यात 12 ते 14 ऑगस्टदरम्यान विदर्भ,कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 14 ऑगस्टला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून 13-14 ऑगस्टसाठी विदर्भात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेव्हा आता या पूर्वानुमानानुसार पाऊस खरंच हजेरी लावतो, की यावेळी चकवा देतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *