ट्रम्प यांच्या ‘डेड इकॉनॉमी’ला अप्रत्यक्ष उत्तर ; भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑगस्ट ।। भारत ही ‘डेड इकॉनॉमी’ असल्याचा डंका पिटणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आता अप्रत्यक्ष पलटवार करण्यास सुरुवात झाली आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून, जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याकडे वेगाने पुढे जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या या विधानाला जागतिक पातळीवर प्रतिहल्ला म्हणून पाहिले जात आहे.

पंतप्रधानांनी सांगितले की, ‘अर्थव्यवस्थेचा हा वेग ‘सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तना’मुळे शक्य झाला. गेल्या ११ वर्षात भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहोचली आणि ती आता टॉप-३ मध्ये पोहोचण्याच्या दिशेने वेगाने वाढत आहे. बंगळुरू मेट्रो फेज-३ प्रकल्पाचे भूमिपूजन, तीन वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण करताना आणि मेट्रो रेल यलो लाइनचे उद्घाटन करताना त्यांनी विविध क्षेत्रांतील वाढीचा आढावा घेतला.

पंतप्रधानांनी तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्यावर भर दिला. ‘विकसित भारत’च्या प्रवासासोबत डिजिटल भारतही प्रगती करीत आहे. ‘इंडिया एआय मिशन’सारख्या उपक्रमांमुळे भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करीत आहे. सेमीकंडक्टर मिशन गती घेत असून, भारतात लवकरच ‘मेड इन इंडिया’ चिप मिळेल’, असेही ते म्हणाले.

पायाभूत सुविधा क्षेत्रात जबरदस्त प्रगती
‘२०१४ मध्ये मेट्रो रेल्वेसेवा फक्त पाच शहरांपुरती मर्यादित होती. मात्र, आज मेट्रो नेटवर्क २४ शहरांत १,००० किमीहून अधिक पसरले आहे, ज्यामुळे भारत जगातील तिसऱ्या क्रमांकावरचा मेट्रो नेटवर्क असलेला देश ठरला आहे.

स्वातंत्र्यापासून २०१४ पर्यंत २०,००० किमी रेल्वे विद्युतीकरण झाले, २०१४ पासून २०२५ पर्यंत हे प्रमाण दुप्पट वाढून ४०,००० किमी झाले. २०१४ मध्ये ७४ विमानतळे होती, ती आज १६०+ झाली. राष्ट्रीय जलमार्गाची संख्या ३ वरून ३० वर पोहोचली.

निर्यातीत भारत जगात टॉप ५ मध्ये
‘२०१४ पूर्वी एकूण निर्यात ४६८ अब्ज डॉलर होती. आज ती ८२४ अब्ज डॉलरवर पोहोचली. मोबाइल आयात करीत होतो; पण आता आपण मोबाइल निर्यात करणाऱ्या जगातील टॉप ५ देशांमध्ये आहोत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात ६ अब्ज डॉलरवरून ३८ अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे,’ असेही मोदी म्हणाले.

‘२०१४ पूर्वी भारताची वाहन निर्यात १६ अब्ज डॉलर होती, जी आता दुप्पट होऊन भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा वाहन निर्यातदार देश बनला आहे. हे यश आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देते. आपण एकत्रितपणे विकसित भारत घडवू,’ असेही मोदी यांनी ठामपणे सांगितले.

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांत प्रचंड भर : ‘२०१४ पर्यंत देशात ७ ‘ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ अर्थात एम्स आणि ३८७ वैद्यकीय महाविद्यालये होती. आता ही संख्या अनुक्रमे २२ एम्स आणि ७०४ महाविद्यालयांपर्यंत वाढली आहे. गेल्या ११ वर्षांत देशभरात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १ लाखाहून अधिक नवीन जागा तयार करण्यात आल्या आहेत.’

बॉस आम्हीच : राजनाथ सिंह
भारताची अर्थव्यवस्था सर्वांत धाडसी व गतिमान आहे. सर्वांचे बॉस आम्ही आहोत. मात्र, काही देशांना हे देखवत नसल्याचा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. मध्य प्रदेशच्या रायसन भारत अर्थ मूव्हर्सच्या रेल्वे कोच विभागाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. भारताला जगातील सर्वांत मोठी शक्ती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. २०१४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावर होती, परंतु आज आपला भारत जगातील टॉपच्या चार देशांच्या रांगेत आला आहे. भारत जेवढ्या वेगाने पुढे जात आहे, ते पाहता गतिमान अर्थव्यवस्था जर कुणाची असेल तर ती भारताची. परंतु, काही लोकांना भारताचा वेगाने होणारा विकास देखवत नाही. त्यांना हे चांगले वाटत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *