महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑगस्ट ।। Feed Pigeons: मुंबई महानगरपालिकेने (BMC) कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी दाणे टाकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, 13 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 या कालावधीत BMC ने 44 कबुतरखान्यांशी संबंधित 142 प्रकरणांमध्ये कारवाई करत 68,700 रुपये दंड वसूल केला आहे. यापैकी सर्वाधिक 22,200 रुपये दंड दादर पश्चिम येथील कबुतरखान्याजवळ 51 जणांकडून वसूल करण्यात आला आहे.
विष्ठेमुळे होणारे आरोग्याचे धोके
गोरेगाव पश्चिमच्या PS विभागातून 6,000 रुपये, तर दादरमधून 5,500 रुपये दंड वसूल झाला. मात्र, BMC च्या B, C, E, L, N या वॉर्डमधून एकही रुपये दंड वसूल झाला नाही.कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे आरोग्य धोके, जसे की श्वसनाचे आजार (हिस्टोप्लास्मोसिस आणि ऍलर्जिक ऍल्व्हिओलायटिस), लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य टाकण्यावर बंदी कायम ठेवली आहे.
500 ते 1,000 रुपये दंड
या आदेशानुसार, BMC ने कबुतरखान्यांवर ताडपत्री लावून बंदिस्त केले आहे. तरीही, काहींनी ताडपत्री फाडून कबुतरांना खाद्य टाकल्याने BMC ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत दादरमध्ये 2 आणि गिरगावात 1 असे 3 गुन्हे दाखल झाले आहेत.BMC ने कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांना प्रथम समज देणे, नंतर 500 ते 1,000 रुपये दंड आकारणे आणि वारंवार उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचे धोरण स्वीकारले आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ठिकठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
बंदी कायम ठेवत तज्ज्ञांची समिती स्थापन
31 जुलै 2025 रोजी उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवरील बंदी कायम ठेवत तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. ही समिती आरोग्य धोक्यांचा अभ्यास करून अहवाल सादर करेल, ज्याच्या आधारे पुढील निर्णय होईल. 11 ऑगस्ट 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेपास नकार दिला.
जैन समाजाचा विरोध
या कारवाईला जैन समाजाने विरोध केला असून, त्यांनी दादर येथील ताडपत्री हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत कारवाईला पाठिंबा दिला आहे. BMC च्या या मोहिमेमुळे मुंबईतील कबुतरखान्यांचा वाद पुन्हा चर्चेत आला असून, नागरिकांच्या आरोग्यासाठी कठोर नियम लागू करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.