महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। Mumbai Urban Transport Project: मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) हाती घेतलेल्या पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरवर काम वेगाने सुरू असून, प्रकल्पाचे 76 टक्के काम पूर्ण झाले आहे. 70 किमीपैकी 21 किमी रूळ बसवण्याचे काम पूर्ण झाले असून, 30 किमीपर्यंत बॅलास्ट फॉर्मेशन (खडी पसरवणे) पूर्ण झाले आहे. त्यामुळे मार्ग लवकरच दृष्टिक्षेपात येण्याची शक्यता आहे. 29.6 किमी लांबीचा हा कॉरिडॉर मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कला नवा पर्याय उपलब्ध करून देणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे खालून धावणार लोकल
पनवेलमार्गे कर्जत प्रवासाचा कालावधी कमी होणार असून, कल्याणमार्गे होणारी गर्दीही कमी होईल. वाढत्या प्रवासी मागणीला प्रतिसाद देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. हा मार्ग डोंगराळ भागातून जात असल्याने वावरले, नधाळ आणि किरवली असे तीन बोगदे बांधण्यात आले आहेत. त्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून, 65 पुलांपैकी 59 पूल (29 छोटे आणि 6 मोठे) पूर्ण झाले आहेत. पुणे एक्सप्रेस-वे अंडरपाससाठी गर्डर लाँच करून एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला आहे.
2782 कोटी रुपयांचा खर्च
हा प्रकल्प मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-३ (एमयूटीपी) अंतर्गत 2782 कोटी रुपयांच्या खर्चातून पूर्ण केला जात आहे. हा कॉरिडॉर दोन जुन्या स्थानकांना जोडतो, तसेच उपनगरातील सर्वात मोठा बोगदा आणि पूल यामध्ये समाविष्ट आहे. सध्या या जुन्या लाइनवर प्रामुख्याने मालगाड्या आणि लांबपल्ल्याच्या प्रवासी गाड्या धावतात. नवीन दुहेरी मार्गिकेमुळे मुंबई-कर्जतदरम्यान लोकल पनवेलमार्गे धावू शकतील.
या प्रकल्पाची वैशिष्ट्यं काय ते पाहूयात
प्रकल्प खर्च : 2782 कोटी
काम पूर्णत्व : 76%
पूल : एकूण 65 पैकी 59 पूल बांधून पूर्ण
बॅलास्ट फॉर्मेशन (खडी पसरवणे) : 70 किमी पैकी 30 किमी मार्ग पूर्ण
रूळ बसवणे : उसरली-चिखले-मोहोपे-चौकदरम्यान 21 किमी अंतराचं काम पूर्ण
स्थानके कोणती असतील : पनवेल, चिखले, मोहोपे, चौक, कर्जत