महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। गेल्या तीन दिवसांपासून पावसाचं रौद्ररूप पाहायला मिळत आहे. संततधार पावसामुळे अनेक भाग तुंबले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली होती, मात्र आता शहर पुन्हा पूर्वपदावर आलं आहे. मात्र ढगांची वाटचाल आता पश्चिम महाराष्ट्राकडे वळल्याने कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
कोल्हापूर
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे कोल्हापूरची पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर आहे. पंचगंगेची पाणीपातळी 42 फूट 7 इंचावर पोहोचली आहे. 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच आहेत. कोल्हापूर – पन्हाळा आणि कोल्हापूर शिये मार्गावर पाणी आल्याने मार्ग बंद झाले आहे. सुतार वाडा येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. राधानगरी धरणाचे २ स्वयंचलित दरवाजे उघडले. राधानगरीतून एकूण 4356 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपत्रात सुरू. पुराचे पाणी आल्यानं कोकणाकडे जाणारे मार्ग अद्याप बंद.
सांगली
सांगलीच्या कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सांगली शहरातील सकल भागांमध्ये पाणी शिरलं आहे. मगरमच्छ कॉलनी, सुरवंशी प्लॉट, मिरज कृष्णा घाट, कुरणे वस्ती या ठिकाणी पाणी शिरल्याने येथील नागरिक स्थलांतर होत आहेत. आतापर्यंत 150 च्या जवळपास कुटुंब स्थलांतरित झाले आहेत. आणखीही काही कुटुंब स्थलांतर होत आहेत. काही घरांमध्येही पाणी शिरले आहे. प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे
पंढरपूर
पंढरपुरात भीमा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. व्यास नारायण आणि अंबिका नगर झोपडपट्टी पावसाचे पाणी शिरले आहे. पुरामुळे १२५ कुटुंब स्थलांतरीत झाले आहे. पुढील काही तासांत आणखी ५० कुटुंब स्थलांतरित होणार आहेत. भीमेच्या पाण्याचा प्रवाह दुथडी भरून वाहू लागला. पुढील काही तासांत अजून पाणी वाढण्याची शक्यता.
चंद्रभागा नदी
पंढरपुरातील चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. शहराला सध्या पूराचा धोका आहे. नदीकाठच्या भागात पाणी शिरल्याने 400 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. गोपाळपूर पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.