Raj Thackeray And Devendra Fadnavis : राज्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा ! राज-फडणवीस भेटीतून राजकारणात नवा अध्याय सुरू?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। मनसेप्रमुख राज ठाकरे आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. सकाळी ९ वाजताच्या सुमारास झालेल्या या भेटीमध्ये, राज ठाकरे यांनी मुंबईतील तसेच राज्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजते. मात्र, या भेटीला विशेष महत्त्व मिळण्यामागे एक पार्श्वभूमी आहे. कालच झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. या पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दारात पोहोचल्याने, राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमुळे पुढील काळात मनसे आणि भाजप यांच्यातील समीकरणे अधिक गडद होतील का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भाजप-महायुतीकडे परतीचा मार्ग खुला?
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत त्यांना एकाही जागेवर यश मिळवता आले नाही. या निकालानंतर भाजप नेत्यांनी ब्रँड ठाकरेची चेष्टा करत जोरदार टीका केली. परंतु, या टीकेत विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्यावर कुणीही थेट टीका केली नाही. भाजप नेत्यांच्या वक्तव्यांतून फक्त उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधण्यात आला, तर राज ठाकरे यांच्या बाबतीत मात्र त्यांच्या बोलण्यात सहानुभूती आणि सॉफ्ट कॉर्नर दिसून आला. त्यामुळे, राज ठाकरे यांच्याशी संबंध कायम ठेवण्याची भाजपची इच्छा अजूनही जिवंत असल्याची चर्चा रंगली. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर भेटीसाठी पोहोचले. या भेटीमुळे, राज ठाकरे यांनीही भाजप आणि महायुतीकडे परतण्याचे दोर अजून पूर्णपणे तोडलेले नाहीत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीत नेमके काय घडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

२१ पैकी एकही जागा नाही
मुंबईकरांचे लक्ष लागून राहिलेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला. मात्र, या निकालात ‘ठाकरे ब्रँड’चा पुरता धुव्वा उडाला आहे. २१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही. विशेष म्हणजे, या निवडणुकीत पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे पक्ष एकत्र आले होते. ‘ठाकरे ब्रँड’ म्हणून प्रचारात मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, निकाल लागल्यानंतर ठाकरेंच्या हाती निराशा आली आणि एकही उमेदवार विजयी झाला नाही. दरम्यान, शशांक राव यांच्या पॅनेलने सर्वाधिक १४ जागा पटकावल्या, तर महायुतीच्या ‘सहकार समृद्धी’ पॅनेलने ७ जागा आपल्या खात्यात जमा केल्या. निकाल स्पष्ट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *