महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीचा निकाल समोर आला. या निवडणुकीत ‘ठाकरे ब्रँड’चा पुरता धुव्वा उडाला. 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत झाले. शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले.
महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार ही निवडणूक जिंकले. या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते.’ठाकरे ब्रँड’ म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजावाजा झाला. मात्र आज पहाटे निकाल लागला आणि ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही.बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाल्यानंतर भाजपकडून ठाकरे गटाला डिवचण्यात आले आहे.दादरच्या सेनाभवन परिसरात भाजपची जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.ठाकरे ब्रँड कोमात तर स्वदेशी देवाभाऊ जोमात, असे म्हणत भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले. विशेष म्हणजे भाजपने हा बॅनरद्वारे फक्त उद्धव ठाकरेंना डिवचल्याचे दिसून येत आहे.या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो लावण्यात आलेला नाही.