गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई- गोवा महामार्गावर… अखेर घेतला मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। गणेशोत्सव… नोकरीधंद्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी गावाकडून थेट शहराची वाट धरणाऱ्या अनेक कोकणकरांना पुन्हा गावाचा ओढ लावणारा एक सण, अनेकांसाठी खऱ्या अर्थानं एक आनंदपर्व. बरं या आनंदपर्वासाठी गावापर्यंत पोहोचण्याचा कोकणवासियांचा संघर्षही तितकाच मोठा. इथं रेल्वेच्या तिकीटांसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणाऱ्या अनेकांच्या हाती अपयश येत असतानाच तिथे रस्ते मार्गानं कोकणातील आपल्या गावी जाण्याऱ्यांपुढंही काही कमी विघ्न येत नाही.

वर्षानुवर्षांपासून ‘तयारच’ होणारा महामार्ग पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. त्यातच दरवर्षी पावसाळ्यादरम्यान या रस्त्याची अनेक टप्प्यांमध्ये जणू चाळण झालेली असते. गणेशोत्सवादरम्यान एसटी बस, खासगी वाहनं ते अगदी लक्झरी बस इथपर्यंतच्या वाहनांची वाढती संख्या असतानाच या मार्गावर अडचणी उभी होतात ती म्हणजे अवजड वाहनांची.

तीव्र चढ असणाऱ्या, निमुळत्या किंवा बाजारपेठांमधून जाणाऱ्या रस्त्यांवर तर याच अवजड वाहनांमुळं लहान वाहनांची वाट आणखी बिकट होते. ज्यामुळं वाहतूक कोंडी, तासन् तास एकाच रस्त्यावर ताटकळत बसणं अशाही समस्या उदभवतात. हीच वस्तूस्थिती पाहता कोकणात जाणाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत यंदाच्या गणेशोत्सवाआधीसुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्यांची गर्दी पाहता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 16 टनापेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना वाहतूक बंदी करण्यात आली आहे. ही बंदी 23 ऑगस्टला मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 28 ऑगस्ट रात्री 11 पर्यंतच्या लागू असेल. जिथं अवजड वाहनं, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी यांना प्रवेशबंदी असेल.

गणपती आगमनानंतर 5 आणि 7 दिवसांच्या गणपती आणि गौरी विसर्जनानंतर परतीच्या प्रवासादरम्यान होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबरला सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत आणि अनंत चतुर्दशीनंतर अर्थात 11 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर 6 सप्टेंबरला सकाळी 8 ते 7 सप्टेंबर रात्री 8 पर्यंत या रस्त्यावर अवजड वाहनांवर बंदी घालण्यात येईल.

कोणत्या वाहनांना या निर्बांधून वगळणार?
अवजड वाहनांना बंदी असली तरीही काही वाहनांना मात्र या यादीतून वगळण्यात आलं असून, यामध्ये जेएनपीटी बंदर ते जयगड बंदर येथून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहनं, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस सिलिंडर, औषधं, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *