महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव बदलण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हे तालुक्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे वेल्हे तालुका आता राजगड नावाने ओळखला जाणार आहे. राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र सरकार यासंदर्भात राजपत्र जारी करणार आहे. मागील अनेक वर्षांपासून वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची ही मागणी होती.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात राजगड आणि तोरणासारखे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातील राजगडाला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण याच राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षं स्वराज्याचा कारभार केला. याच किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे गाव वसलं आहे. यामुळे राजगड किल्ल्याचं नाव तालुक्याला देण्यासंदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही त्याला मंजुरी दिली आहे.
गावकऱ्यांची मागणी
वेल्हे तालुक्याचं नाव ‘राजगड’ करावं यासाठी ठराव घेण्यात आले होते. यादरम्यान तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करण्यात आली होती. पुणे विभागीय आयुक्तांकडून 5 मे 2022 ला प्रस्ताव सादर करुन घेण्यात आला होता.
अजित पवारांनी एकनाथ शिंदेंकडे केली होती मागणी
अजित पवार यांनी 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रातून त्यांनी वेल्हे तालुक्याचं नाव बदलून ‘राजगड’ करण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी केली होती. त्यावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते होते. विशेष म्हणजे आता जेव्हा नाव बदललं आहे, तेव्हा अजित पवार सत्तेत असून उपमुख्यमंत्री आहेत.