महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०८ सप्टेंबर | गणेशोत्सवात यंदा पुणे मेट्रोनेही वेगळाच ठसा उमटवला आहे. शहराच्या वाहतुकीतील प्रचंड गर्दी कमी करण्यासाठी सुरू झालेली मेट्रो सेवा आता पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिचा वापर विक्रमी पातळीवर झाला आहे. एकाच दिवसात तब्बल सहा लाख प्रवाशांनी मेट्रोची निवड केली, तर दहा दिवसांच्या गणेशोत्सव काळात तब्बल चाळीस लाख पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास करून नवा विक्रम रचला.
स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवर प्रवाशांचा ओघ इतका मोठा होता की, मेट्रो स्थानकं अक्षरशः गजबजून गेली होती. विशेष म्हणजे शहराच्या मध्यभागातील महात्मा फुले मंडई स्थानक हे सर्वाधिक लोकप्रिय ठरले. येथे तब्बल ६६ हजार ५४२ प्रवाशांनी प्रवास केला. डेक्कन जिमखाना स्थानकावर ६४ हजार ७०३, पिंपरी चिंचवड महापालिका स्थानकावर ४८ हजार ३६३, स्वारगेटवरून ४४ हजार ९१७ आणि पुणे महापालिका स्थानकावरून ३९ हजार २०८ प्रवाशांनी मेट्रोचा लाभ घेतला.
२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या १० दिवसांत दररोज लाखो प्रवासी मेट्रोतून प्रवास करत होते. २७ ऑगस्ट रोजी २ लाख २८ हजार प्रवासी होते, तर ३० ऑगस्ट रोजी हा आकडा ३ लाख ६८ हजारांवर पोहोचला. ४ सप्टेंबरला ३ लाख ९७ हजार आणि ६ सप्टेंबरला विक्रमी ५ लाख ९० हजार प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला.
या दहा दिवसांत तब्बल ३९ लाख ६० हजार ९३७ प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला असून, त्यातून ५ कोटी ६६ लाख ७१ हजार ६९१ रुपयांचे उत्पन्न मेट्रोच्या तिजोरीत जमा झाले आहे. गणेशोत्सवाच्या काळात मिळालेल्या या विक्रमी प्रतिसादामुळे मेट्रो प्रशासनालाही भविष्यातील नियोजनात मोठा आत्मविश्वास मिळाला आहे.
गणेशोत्सव हा पुण्याच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनासाठी लाखो भाविक पुण्यात दाखल होतात. त्यामुळे रस्त्यांवर होणारी गर्दी, वाहतुकीतील कोंडी टाळण्यासाठी मेट्रो हा सुरक्षित आणि जलद पर्याय ठरला. पुणेकरांसह बाहेरून आलेल्या नागरिकांनीही मेट्रोच्या वेगवान सेवेचा लाभ घेतल्याचे दिसून आले.