महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०८ सप्टेंबर | हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसणार आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कमी दाब क्षेत्रामुळे पोषक हवामान तयार झाले असून, रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात तब्बल १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकणातील काही भाग तसेच मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यातही ठिकठिकाणी १०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला आहे. यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाणी पातळीत वाढ झाली आहे.
राज्यातील उर्वरित भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असून ढगाळ वातावरण कायम आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये देखील आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. एकीकडे पावसाचा जोर पिकांसाठी दिलासादायक ठरतो आहे, तर दुसरीकडे विजांच्या कडकडाटामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यामुळे वातावरणात भीतीचं सावट आहे.
पुढील काही दिवस राज्यात पावसाचा हा खेळ चालू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, तर शेतकऱ्यांनी पिकांची आणि शेती उपकरणांची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.