महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १२ सप्टेंबर | मुंबई शहर आणि उपनरांसह कोकणातील काही भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतलेली असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांसह विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र जोरदार पावसाची हजेरी, तर काही भागांमध्ये पूरस्थिती पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या मुंबई केंद्रानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असा इशारा वर्तवण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी असल्या कारणानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही दुर्गम भागांमध्येसुद्धा वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी राहणार असून, यादरम्यानवी ताशी 40 किमी वेगानं वारे वाहतील, याची दक्षता बाळगावी असा इशारा दारी करण्यात आला आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी केंद्रीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाचा आढावा घेत दिलेल्या माहितीनुसार, ’13 ते 15 सप्टेंबरपर्यंत अंतर्गत महाराष्ट्र, उत्तर कोकणातील काही भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.’ वरील अंदाजामध्ये मुंबईसह नजीकच्या भागांचा आणि प्रामुख्यानं किनारपट्टी क्षेत्रांचा समावेश असून पुढच्या 24 तासांपासूनच काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची हजेरी पाहायला मिळू शकते , तर 16 सप्टेंबरनंतर कोकणात कमी तीव्रतेने पाऊस सुरू राहू शकतो.
Thunderstorm accompanied with lightning, heavy rain and gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of South Madhya Maharashtra and Marathwada.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 11, 2025
विदर्भाच्या कोणत्या भागांना पावसानं झोडपलं? पूरस्थितीनं नागरिक बेजार
चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात दमदार पावसाने धरणे आणि नद्या यांच्यात मोठा पाणी संचय झाला. ज्यामुळं नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. गेल्या 24 तासात चंद्रपूर शहर जिल्ह्यात 28 मिलिमीटर सरासरी पाऊस झाला. यंदा आजपर्यंत वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 96.2% एवढा पाऊस नोंदला गेलाय. सध्याही शहर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे असल्याचं सांगण्यात आलं आहे.