महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १२ सप्टेंबर | गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत झालेल्या धक्कादायक गोळीबाराने पुणे शहर हादरले आहे. या दिवशी १८ वर्षीय आयुष गणेश कोमकर याची तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या वनराज आंदेकर हत्याकांडाशी जोडली जात असून, आंदेकर टोळीने बदला म्हणून आयुषला टार्गेट केल्याचा संशय आहे. अशातच आता पोलिसांनी बंडू आंदेकरच्या घराची झडती घेतली. यावेळी पोलिसांना कोट्यवधीचा मुद्देमाल मिळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंड बंडू आंदेकर याच्या घराची पोलिसांनी घेतलेल्या झडतीत कोट्यवधी रुपयांचा ऐवज हाती लागला आहे. पोलिसांनी तब्बल ६७ लाखांचे सोन्याचे दागिने,चांदी, २ लाख ५० हजार रुपयांची रोकड,एक अलिशान मोटार कार, विविध करारनामे आणि कर भरल्याच्या पावत्या, असा मोठा मुद्देमाल जप्त केला.
याशिवाय आंदेकरने केलेल्या जमीन व्यवहाराच्या काही इसार पावत्याही पोलिसांना मिळाल्या आहेत. आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर (वय १९, रा. नाना पेठ) या महाविद्यालयीन तरुणाच्या खुनाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
गृहकलहातून बंडू आंदेकरने स्वतःच्याच नातवाच्या हत्येचा कट रचला होता. ५ सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला रात्री साडेसातच्या सुमारास नाना पेठेत हल्लेखोरांनी आयुष कोमकरवर गोळ्यांचा वर्षाव केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या आयुष्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. खुनानंतर आंदेकर कुटुंबासह प्रवास करून देवदर्शनासाठी निघाला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.