महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १२ सप्टेंबर | भारताच्या शेजारचा छोटासा देश नेपाळ मागच्या तीन दिवसांपासून हिंसाचारामध्ये होरपळत आहे. सोशल मिडिया बॅनवरुन सुरु झालेल्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं. अवघ्या दोन दिवसात के.पी. शर्मा ओली यांचं सरकार कोसळलं. जेन-Z समर्थकांनी केलेल्या आंदोलनात नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. नेते, मंत्र्यांना पळवून पळवून मारण्यात आलं. हा राग आणि चिडीमागे मुख्य कारण होतं,
नेपाळमधला भ्रष्टाचार आणि बेरोजगारी. नेपाळमध्ये सत्तापालट झाल्यानंतर नवीन पंतप्रधान कोण बनणार? यावर विविध तर्क-वितर्क सुरु होते. अखेर आता एका नावावर शिक्कामोर्तब झालय. नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनणार आहेत. राष्ट्रपती रामचन्द्र पौडेल त्यांना शपथ देतील. जेन-Z समर्थकांमध्ये त्यांच्या नावावर एकमत झालं.काठमांडूचे महापौर आणि PM पदाचे प्रबळ दावेदार बालेन शाह यांनी सुद्धा कार्की यांचं समर्थन केलय. अंतरिम पंतप्रधानपदासाठी कुलमान घिसिंग यांचं नाव सुद्धा शर्यतीत होतं. घिसिंग यांनी नेपाळ वीज बोर्डात काम केलय.
