![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २८ ऑक्टोबर २०२५ | केंद्रीय हवामान विभागाचं (IMD) लक्ष ‘मोंथा चक्रीवादळा’वर केंद्रित असतानाच, महाराष्ट्रावर त्याचे अप्रत्यक्ष परिणाम दिसू लागलेत. सागरी वाऱ्यांची दिशा आणि तीव्रतेत झालेला बदल आता राज्याच्या हवामानात मोठा फरक घडवणार आहे. पुढील ४८ तासांत महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यांचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
⚠️ अतिदक्षतेचा इशारा — किनारपट्टी भागात धोक्याची घंटा!
दक्षिण कोकणापासून गोव्यापर्यंत वादळी वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किमीपर्यंत जाऊ शकतो. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, समुद्र खवळलेला असल्याने मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.
तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातही सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाचा अंदाज आहे.
🌩️ विदर्भात पावसाचा जोर वाढणार!
पुढील २४ तासांत बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
तर सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि अहमदनगर येथे तुरळक सरींची हजेरी दिसेल, असंही आयएमडीनं सांगितलं आहे.
🌧️ मुंबईत हवामानाचा बदल सुरूच!
मुंबई आणि उपनगरांत सोमवारी संध्याकाळपासूनच वादळी वाऱ्यांसह पावसाची सुरूवात झाली. पुढील २४ तासांमध्ये हेच चित्र कायम राहणार असून, ढगाळ वातावरण, कारवा हवामान आणि अचानक कोसळधार असं दृश्य दिसेल.
चक्रीवादळाचे अप्रत्यक्ष परिणाम मुंबई आणि आसपासच्या किनारी भागात स्पष्टपणे जाणवणार आहेत.
➡️ नागरिकांनी हवामानातील झपाट्याने बदल लक्षात घेऊन सतर्क राहावं,
तर मासेमारांनी पुढील काही दिवस समुद्रात जाणं टाळावं, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.
