![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ ऑक्टोबर २०२५ | राज्यात ‘ऑक्टोबर हिट’चा ताप वाढलेला असताना आता चक्रीवादळाचं संकट आलं आहे. मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात आणि उद्या पावसाची शक्यता आहे.मोंथा चक्रीवादळाचे रुपांतर काल सकाळी अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. ही चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशातील काकीनाड भागात किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, छत्तीसड आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
२७ ऑक्टोबरला आंध्र किनारपट्टीपासून १७० कि.मी. वर असलेले ‘मोंथा’ चक्रीवादळ २८/२९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री काकीनाडा (आंध्र प्रदेश) किनारपट्टीला ८०–८५ कि.मी. प्रतितास वेगाने धडकणार आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ ३० ऑक्टोबरला महाराष्ट्रातील नागपूर परिसरावरून पुढे जाऊन ३१ ऑक्टोबरला बिहार–पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशात प्रवेश करेल.
या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि शेजारच्या भागात सोमवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. तेलंगणाच्या काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भात उद्या पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या किनारी आणि उत्तर भागात, तमिळनाडू आणि केरळमध्येही काही ठिकाणी दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.
हवामान खात्याने मोंथा चक्रीवादळामुळे राज्यातील मुंबई, मुंबईउपनगर, विदर्भ, कोकणात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुढील काही दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मुसळधार पाऊस पडणार आहे . दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ‘मोंथा’च्या प्रभावामुळे २७ ते ३० ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र–गुजरात किनाऱ्याच्या आसपास स्थिरावलेला राहणार असून ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान गुजरातमार्गे राजस्थानकडे सरकण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
