![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ ऑक्टोबर २०२५ | कबुतरखान्यांसाठी नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध महापालिकेने घ्यावा, अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे मंगळवारी केली. त्यावर, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन त्याबाबतची माहिती आधी न्यायालयाकडे सादर करण्यात येईल. त्याचबरोबर नियंत्रित खाद्य पुरवठ्याबाबतही न्यायालयाच्या निर्देशानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे गगराणी यांनी स्पष्ट केले.
कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य पुरवावे किंवा कसे, तसेच यातील अन्य मुद्यांबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार हरकती, सूचना मागविण्याची कार्यवाही पालिका प्रशासनाने केली आहे. त्यामुळे पर्यायी जागांचा शोध घेतला तरी कबुतरखान्यांची बाब न्यायप्रविष्ट असल्याने पर्यायी जागांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, असे आयुक्तांनी शिष्ट मंडळाला सांगितले.
१३ ठिकाणी नवे कबुतरखाने होणार?
सद्य:स्थितीत मुंबईत ५१ कबुतरखाने आहेत. महापालिकेच्या सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना लोकवस्तीपासून ५०० मीटर अंतरावर नवीन कबुतरखाने उघडण्यासाठी जागेचा शोध घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी केल्या होत्या.
यासंदर्भातील अहवाल २५ वॉर्ड अधिकाऱ्यांनी आयुक्त आणि महापालिका आरोग्य विभागाला सादर केला आहे. २५ पैकी १२ वॉर्डांमध्ये १३ ठिकाणी नवीन कबुतरखाने तयार करण्याचा अहवाल महापालिकेला सादर झाला आहे. उर्वरित १३ वॉर्डांमध्ये जागाच उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
