 
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ ऑक्टोबर २०२५ | महाराष्ट्रातील दहशतवादीविरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने 27 ऑक्टोबर रोजी पुण्यातील कोंढवा परिसरातून अटक केलेल्या कुख्यात दहशतवादी जुबेर हंगरगेकरचं लादेन कनेक्शन समोर आलं आहे. अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या जुबेरकडे सापडलेल्या गोष्टी पाहून तपास यंत्रणांनाही धक्का बसला आहे. महाराष्ट्र आणि इतर शहरांमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या कट रचण्याच्या संशयावरून जुबेरला अटक करण्यात आली असून त्याच्या चौकशीदरम्यान हादरवून टाकणारे खुलासे समोर येत आहेत.
जुबेरच्या लॅपटॉपमध्ये काय सापडलं?
जुबेरच्या लॅपटॉपमध्ये अल-कायदासंदर्भातील साहित्य डाउनलोड केलेले आढळून आले आहे. पाकिस्तानमधील सक्रीय दहशतवादी संघटना असलेल्या अल-कायदाच्या संपर्क असलेल्या जुबेरने युवकांना भडकावण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हंगरकेकर जवळ अल कायदाशीसंबंधित मासिकातील एके 47 रायफलने गोळीबार करण्याच्या पद्धतीच्या माहितीची कात्रणं सापडली आहेत. तसेच बॉम्ब तयार करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत याची छायाचित्रं व माहिती जुबेरकडे आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेतील ट्विन्स टॉवर पाडणारा कुख्यात दहशतवादी ओसामा बीन लादेनशी संबंधित एक हादरवणारा खुलासा तपासात समोर आला आहे.
लादेन कनेक्शन उघड
एटीएसच्या तपासादरम्यान जुबेर हंगरगेकरकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले आहे. त्यामुळे ही प्रक्षोभक भाषणं जुबेरने कोणाला ऐकवली का? या माध्यमातून त्याने कोणाची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला आहे का? याचा शोध आता यंत्रणांकडून घेतला जात आहे.
किती जणांचं ब्रेन वॉशिंग केलं?
जुबेरच्या संपर्कात किती कट्टरतावादी तरुण मुले आहेत याचा शोध आता घेतला जात आहे. जुबेर आणि त्याच्या साथीदारांनी आणखी कोणाला अलकायद्याचे सदस्य होण्यासाठी त्यांचं ब्रेन वॉशिंग केलं होतं याचा शोध एटीएसकडून घेतला जात आहे.
या शहरांमध्ये हल्ल्याचा होता प्लॅन?
महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासारख्या शहरांसोबतच गुजरातमध्ये आणि देशातील इतर शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट जुबेर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रचला होता. 2023 च्या आयएसआयएस मॉड्युलशी जुबेरचं काही कनेक्शन आहे का याचा शोध घेतला जातोय.
आयटी कंपनीत करतो नोकरी
एटीएसने पुण्यात 10 ठिकाणी छापे टाकले. जुबेरला सोमवारी अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर केल्यावर 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अनधिकृत कायदे प्रतिबंधक कायदा यूएपीएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर हंगरगेकर हा स्वत: उच्चशिक्षित असून आयटी कंपनीत काम करतो. त्याला लाखो रुपयांचं सॅलरी पॅकेज असल्याची माहिती समोर आली आहे. आयटी कंपनीमध्ये लाखोंचा पगार घेऊन जुबेर दहशतवादी कारवायांमध्येही सहभागी होता असं तपासात समोर आलं आहे. तरुणांना दहशतवादाकडे वळण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम तो करायचा. 
